राज ठाकरेंकडून ठाकरे सरकारच्या निर्णयाचे समर्थन; म्हणाले, आता कच खाऊ नका

राज्य सरकारकडून (Mahavikas Aghadi Government) राज्यातील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
राज ठाकरेंकडून ठाकरे सरकारच्या निर्णयाचे समर्थन; म्हणाले, आता कच खाऊ नका
Raj Thackeray Statement on Marathi SignboardSarkarnama

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या काल (ता.12 जानेवारी) पार पडलेल्या बैठकीत एक महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यानुसार आता राज्यातील सर्वच्या सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्वागत केले आहे. राज ठाकरे यांनी या संदर्भात एक निवेदन प्रसिद्ध करुन राज्य सरकारचे (Mahavikas Aghadi Government) अभिनंदन केले आणि आता मात्र, कच खाऊ नका या निर्णयाची अंमलबजावणी नीट करा, असा सल्लाही त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

Raj Thackeray Statement on Marathi Signboard
'आम्ही 'बापूं'च्या संस्कारावर राजकारण करतो'

राज ठाकरे यांच्या निवेदनाची प्रत सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये ठाकरे म्हणाले की, या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये. परंतु, २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. काल महाराष्ट्र मंत्रिमंडळानं दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत, असा निर्णय घेतला तेव्हा त्याचे श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांचं मन:पूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये. त्यावर अधिकार आहे फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचा. आणि महाराष्ट्र सरकारचंही अभिनंदन.

सरकारला आता मी इतकंच सांगेन की, आता कच खाऊ नका. ह्याची अंमलबजावणी नीट करा. यात आणखी एक भानगड राज्य सरकारनं करुन ठेवली आहे की, मराठी भाषेशिवाय इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. ह्याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा आम्हाला करायला लावू नका, अश्या शब्दात ठाकरेंनी राज्य सरकारचे अभिनंदन केले व काही सल्ले द्यायलाही ते विसरले नाहीत.

Raj Thackeray Statement on Marathi Signboard
महाराष्ट्र हादरला! रुग्णालयाच्या गोबरगॅस टाकीत १ भ्रूण आणि ५ कवट्या

ठाकरे यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले. मात्र, त्याचे श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे हे सांगायला ते विसरले नसून कुणीही याबाबत श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये, असा इशाराही त्यांनी या पोस्टच्या माध्यमातुन दिला आहे.

दरम्यान, राज्य मंंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आता राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापने देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करतील. मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपी बरोबरच इतर भाषेतही लिहू शकतो. मात्र, मराठी भाषेतील नामफलक हा आधी लिहिणे आवश्यक आहे. मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल, अशा आस्थापनेस महापुरुष, महनीय महिला यांची किंवा गड किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नयेत, असा निर्णय घेण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in