केबीसीमधील `तो` प्रश्न, हिंदु धर्मीयांच्या भावना दुखावणारा; अमिताभ विरुद्ध गुन्हा दाखल करा.. - question in KBC, hurting the feelings of Hindus; File a case against Amitabh. | Politics Marathi News - Sarkarnama

केबीसीमधील `तो` प्रश्न, हिंदु धर्मीयांच्या भावना दुखावणारा; अमिताभ विरुद्ध गुन्हा दाखल करा..

जगदीश पानसरे
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

हा प्रश्न तयार करणे, विचारणे आणि प्रसारित करण्यामागे केवळ हिंदू धर्म, धर्मग्रंथ, धर्मनिष्ठा यांचा अपमान करणे व भावना दुखावणे हाच उद्देश दिसतो. या प्रश्नाच्या उत्तरासाठी दिलेल्या पर्यांयामध्ये देखील केवळ हिंदु धर्मियांच्या ग्रंथांचे पर्याय देण्यात आले असून हे धर्मग्रंथ जाळण्यायोग्यच आहेत, अशी भावना सर्वसामान्यांमध्ये पसरवण्यात आली आहे. हिंदू आणि बौद्ध धर्मियांमध्ये वैमनस्य पसरवणे हाच यामागे हेतू दिसतो.

औरंगाबाद ः सोनी टीव्हीच्या `कौन बनेगा करोडपती` या गेम शो मध्ये ३० आॅक्टोबर रोजी विचारण्यात आलेला प्रश्न आणि त्यासाठी देण्यात आलेल्या पर्यायांमुळे हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. केवळ हिंदू आणि बौद्ध धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी शंभर वर्षापुर्वी घडलेल्या इतिहासातील जखमांवरी खपल्या काढण्याचा हा प्रकार या शोचे अॅंकर अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्ही वाहिनीने केला आहे. सामाजिक शांतता भंग करण्याचा हा प्रकार असून अमिताभ व सोनी टीव्ही विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी औश्याचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूर पोलिस अधिक्षकांकडे अर्जाद्वारे केली आहे.

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात २५ डिसेंबर १९२७ रोजी डाॅ. बाबासाहेबआंबेडकर यांनी व त्यांच्या अनुयायांनी कोणत्या धार्मिक ग्रंथाच्या प्रती जाळल्या होत्या, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यासाठी दिलेल्या पर्यांयांमध्ये हिंदूच्या अन्य पवित्र ग्रंथाची नावे देण्यात आली होती. आमदार अभिमन्यू पवार यांनी यावर आक्षेप नोंदवत अमिताभ बच्चन यांच्यासह सोनी टिव्ही विरोधात हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारा अर्ज लातूर पोलीस अधिक्षकांकडे केला आहे.

या अर्जात अभिमन्यू पवार यांनी नमूद केले आहे की, अमिताभ व सोनी टीव्ही यांच्या कौन बनेगा करोडपती शोने मी व माझ्या सारख्या करोडी हिंदू धर्मीयांचा जाणीवपूर्वक अपमान व मानहानी केली आहे. हिंदू आणि बौद्ध धर्मीयांमध्ये असणारे शांततापुर्ण संबंध यात वितुष्ट आणण्याच्या उद्देशाने वरील कृत्य करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत.

ज्या वाहिनीवरून हा शो प्रसारित करण्यात आला तो कोट्यावधी लोक पाहतात.  ३० आॅक्टोबर रोजी रात्री या कार्यक्रमात स्पर्धकाला वरील प्रश्न विचारण्यात आला होता. यामध्ये विष्णुपुराण, भगवद्गगीता, रुग्वेद, मनुस्मृती हे चार पर्याय देण्यात आल होते. या प्रश्नाने हिंदु तसेच बौद्ध धर्मियांना मानसिक व धार्मिक आघात पोहचला आहे. भारतीय दंडसंहितेच्या अनेक कलमान्वये अमिताभ व सोनी टीव्हीच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

हा प्रश्न तयार करणे, विचारणे आणि प्रसारित करण्यामागे केवळ हिंदू धर्म, धर्मग्रंथ, धर्मनिष्ठा यांचा अपमान करणे व भावना दुखावणे हाच उद्देश दिसतो. या प्रश्नाच्या उत्तरासाठी दिलेल्या पर्यांयामध्ये देखील केवळ हिंदु धर्मियांच्या ग्रंथांचे पर्याय देण्यात आले असून हे धर्मग्रंथ जाळण्यायोग्यच आहेत, अशी भावना सर्वसामान्यांमध्ये पसरवण्यात आली आहे. हिंदू आणि बौद्ध धर्मियांमध्ये वैमनस्य पसरवणे हाच यामागे हेतू दिसतो.

त्यामुळे संबंधित वाहिनी आणि कलाकाराच्या विरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम १५३ (ए), २९०, २९५, (ए), २९८,५०४ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी अभिमन्यू पवार यांनी अर्जात केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख