प्रकाश आंबेडकरांची पावले हिंदुत्वाच्या दिशेने... - Prakash Ambedkar's steps towards Hindutva  | Politics Marathi News - Sarkarnama

प्रकाश आंबेडकरांची पावले हिंदुत्वाच्या दिशेने...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020

आंबेडकर व भाजपचे आतून साटेलोटे आहे, असा आरोप नेहमी केला जातो. त्यात काही तथ्य असावे असे वाटत नाही.

मुंबई :  "अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर व त्यांच्या वंचित बहुजन आघाडीची पावले हिंदुत्वाच्या दिशेने पडत असतील तर त्यांच्या नव्या दिंडीयात्रेचे स्वागतच करावे लागेल," असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त केलं आहे.  

अ‍ॅड. आंबेडकरांनी ‘नामदेव पायरी’चेही दर्शन घेतल्याचे समजते. देह विसर्जन करण्यासाठी नामदेव पंढरीला आले आणि विठ्ठलाच्या महाद्वारी त्यांनी समाधी घेतली. तीच ‘नामदेवाची पायरी’ म्हणून प्रसिद्ध आहे. नामदेवांच्या चरित्रामध्ये अनेक लोकविलक्षण चमत्कारांचा उल्लेख आहे. तसा एक विलक्षण चमत्कार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरात माऊलीचे दर्शन घेऊन केला. कपाळास बुक्का, चंदन लावून अ‍ॅड. आंबेडकर मंदिरात गेले. एक प्रकारे त्यांनी भगवी पताकाच खांद्यावर घेतली. अ‍ॅड. आंबेडकर व त्यांच्या वंचित बहुजन आघाडीची पावले हिंदुत्वाच्या दिशेने पडत असतील तर त्यांच्या नव्या दिंडीयात्रेचे स्वागतच करावे लागेल, असं राऊत यांनी अग्रलेखात म्हटलं आहे. 

संजय राऊत म्हणतात की मंदिरांसंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आंदोलनाचा संबंध भाजपच्या घंटानादाशी जोडला जातो, हा निव्वळ योगायोग समजायला हवा. अ‍ॅड. आंबेडकर व भाजपचे आतून साटेलोटे आहे, असा आरोप नेहमी केला जातो. त्यात काही तथ्य असावे असे वाटत नाही. लोक दहा तोंडांनी बोलतात व शंभर कानांनी ऐकतात त्याला इलाज नाही. कोरोनाच्या संकटात निदान मंदिर-मशिदीचे राजकारण करू नये, पण विरोधकांना येनकेनप्रकारेण फक्त गोंधळाचे वातावरण निर्माण करायचे आहे. 

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे बौद्ध धर्माचे उपासक आहेत, पण राज्यातील बहुजन वंचित आघाडीचे नेतृत्व ते करतात. जे देश बौद्धधर्मीय आहेत त्या देशांतही बौद्ध प्रार्थनास्थळांत लोकांना प्रवेश नाही अशी स्थिती आहे. प्रकाश आंबेडकर यांना जनतेचे प्रश्न समजतात व वारे कोणत्या दिशेला वाहतात हेसुद्धा समजते. मंदिरे उघडा ही लोकभावनाच आहे हे जसे अ‍ॅड. आंबेडकरांना समजते तसे सरकारलाही समजत असावे व कोणतेही सरकार लोकभावनेला चिरडू शकत नाही. तरीही विरोधक बेबंद वागतात तसे सरकारला वागता येत नाही, असं राऊत यांनी सांगितलं.

काय म्हणतात संजय राऊत...

  1. मंदिरांसंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आंदोलनाचा संबंध भाजपच्या घंटानादाशी जोडला जातो, हा निव्वळ योगायोग समजायला हवा. अ‍ॅड. आंबेडकर व भाजपचे आतून साटेलोटे आहे, असा आरोप नेहमी केला जातो. त्यात काही तथ्य असावे असे वाटत नाही.
  2. कोरोनाच्या संकटात निदान मंदिर-मशिदीचे राजकारण करू नये, पण विरोधकांना येनकेनप्रकारेण फक्त गोंधळाचे वातावरण निर्माण करायचे आहे. पंढरपुरात मराठी जनतेची विठाई माऊली आहे. पंढरीनाथाखेरीज मराठी माणसांना इतर देवतांना भजण्याचे कारण नाही असे आचार्य अत्रे म्हणत ते खरेच आहे. 
  3. पंढरपूर हे आपल्या सगळय़ांचेच मोक्षपीठ आहे व आषाढी-कार्तिकीची वारी हाच महाराष्ट्राचा धर्म आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार याच धर्माशी बांधील आहे. त्यामुळे उगाच थाळय़ांचा नाद करून विरोधकांनी ध्वनिप्रदूषण वाढवू नये. 
  4. Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख