गरिबांना बाजारातील महागडी लस परवडणार नाही, मोफतच द्या..
Hingoli Shivsena Mp Hemant Patil Demand Free Vaccine News

गरिबांना बाजारातील महागडी लस परवडणार नाही, मोफतच द्या..

लस कुणी पैसे देऊन घेणार असेल, तर अशा नागरिकांना ते पैसे शासन दरबारी जमा करण्याची मुभा किंवा व्यवस्था निर्माण केली जावी.

हिंगोली : राज्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर राज्यात व जिल्ह्यात लसीकरण थांबले होते. आता नव्याने लसीचा पुरवठा झाल्याने सर्वसमान्यांना लस मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या १ मे पासून देशातील १८ वर्षाच्या वरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही लस मोफत मिळणार की मग त्यासाठी पैसे मोजावे लागणार यावरून वेगवेळ्या चर्चा सुरू आहेत. बाजारात मिळणारी लस ही महाग असल्यामुळे ती गरीबांना परवडणार नाही, तेव्हा केंद्र व राज्य सरकारने ती मोफतच द्यावी, अशी मागणी हिगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे.

जिल्ह्यातील कोरोना व आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी आलेले असतांना त्यांनी हे मत व्यक्त केले. राज्यात अठरा वर्षावरील सर्वांच्या लसीकरणाचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय. यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी व विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांमध्ये कलगितुरा रंगला आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत पाटील यांनी गरीबांना मोफत लस देण्याची मागणी करतांनाच जे विकतची लस घेऊ शकतात, त्यांनी ज्या पद्धतीने गॅसची सबसिडी नाकरली होती, त्याच प्रमाणे मोफत लस नाकारून त्याचे पैसे शासन दरबारी जमा करावे, तशी सुविधा उपलब्ध करून दिली गेली पाहिजे, असेही पाटील म्हणाले.

राज्यावरील कोरोनाचे संकट वाढले आहे, रुग्णांची संख्या, मृतांचे प्रमाण हे चिंता वाढवणारे असले तरी राज्य व केंद्र सरकार कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. कोरोना महामारीच्या विरोधात लढण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढवण्याच्या दृष्टाने देशात मोठ्या प्रमाणावर कोरोना लसीकरण मोहिम राबवली जात आहे.

आतापर्यंत ४५ वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. अनेकांना दुसरा डोस देखील दिला गेला आहे. यानंतर आता दुसऱ्या टप्यात देशातील १८ वर्षावरील सर्वांनाच कोरोना लस देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. या निर्णयाचे देशभरातून स्वागत होत असतांनाच आता हे लसीकरण मोफत होणार की त्यासाठी पैसे आकारले जाणार यावरून वाद सुरू आहे.

मोफत की पैसे देऊन, निर्णय ऐच्छिक असावा

राज्य सरकारला ही लस केंद्र किंवा संबंधित कंपन्यांकडून विकत घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी केंद्राला मिळणारी आणि राज्यांना मिळणारी लस यांच्या दरात देखील मोठी तफावत असणार आहे. त्यामुळे अठरा वर्षांवरील प्रत्येकाला लस मोफत मिळणार की मग त्यासाठी पैसे आकारले जाणार याबद्दल संभ्रमाचे वातावरण आहे. महाराष्ट्रातील आघाडी सरकार ही लस सर्वसामान्यांना मोफत देणार असल्याच समजते.

यावर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. पाटील म्हणाले, सर्वसामान्य व गरीबांना बाजारभावात लस घेणे परवडणार नाही, त्यामुळे ती मोफतच मिळाली पाहिजे. ज्यांना लस पैसे देऊन घेण्याची इच्छा आहे, त्यांना तशी मुभा सरकारने उपलब्ध करून द्यावी. गॅसची सबसिडी ज्या पद्धतीने काही नागरिकांना स्वेच्छेने नाकारली होती, त्याच धरतीवर लस कुणी पैसे देऊन घेणार असेल, तर अशा नागरिकांना ते पैसे शासन दरबारी जमा करण्याची मुभा किंवा व्यवस्था निर्माण केली जावी, असेही पाटील म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in