शंभूराज देसाई भुलथापा मारण्यात पटाईत : सत्यजितसिंह पाटणकर

 शंभूराज देसाई भुलथापा मारण्यात पटाईत : सत्यजितसिंह पाटणकर

पाटण : ढेबेवाडीत जाऊन कोयनेचा तर तारळ्यात जाऊन कुंभारगावच्या विकासाचे दाखले देणाऱ्या आमदार शंभूराज देसाई यांना पाटण तालुक्‍यात केलेला विकास कऱ्हाडला जाऊन सांगण्याची वेळ का येते ? येथील पत्रकारांना त्यांच्या भुलथापा व विकासाच्या गप्पा माहित आहेत. आमदार देसाईंना कऱ्हाडला जाऊन पाटणचा विकास सांगण्याची वेळ आली आहे. विकास खरा असेल तर तो पाटणमध्येच का सांगत नाहीत ? असा युक्तीवाद राष्ट्रवादीचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केला आहे. 

सत्यजितसिंह पाटणकर यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले की, आमदार देसाई तुम्ही फक्त भुलथापा देण्यात पटाईत आहात. एका भागात जाऊन दुसऱ्या भागात कसा कोट्यावधीचा विकास केला याची भाषणे द्यायची. ती पेपरमध्ये छापून घ्यायची. सातत्याने एकच गोष्ट वारंवार सांगितल्याने ती कधी तरी खरी वाटते. या ग्लोबेल्स नितीचा तुमचा विचार असला तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मतदारांनी हा तुमचा फसवा बुरखा फाडून टाकला आहे. विजय झाला की स्वकर्तृत्व आणि पराभव झाला की धनशक्ती ही तुमची कायमचीच टिमकी आहे. मग विधानसभेतील तुमचा, त्यानंतर साखर कारखाना व तीन जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सहा सदस्य मिळवून घेतलेला विजय हा तुम्ही धनशक्तीवर मिळविला हे तुम्हाला मान्यच असेल. 

पाटण तालुक्‍यात यावर्षी जास्त पावसामुळे पिके कुजली. शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्या काळात ओला दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे होता. मुख्यमंत्री तुमचे जवळचे मित्र असल्याने ते सहजशक्‍य होते. मात्र ते तुम्हाला जमले नाही. या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात तुम्ही किती आवाज उठवला हे जगजाहीर आहे. पुरवणी यादीत चार विभागांचा समावेश करून स्वतःची पाठ थोपटून घेणे म्हणजे तुमचे कर्तृत्व. याला तालुक्‍याचे आमदार म्हणायचे का. त्यामुळे तुम्हीच स्वतः आमदार असल्याचे विसरताय आणि संपूर्ण तालुका ओला दुष्काळात बसविणे तुम्हाला शक्‍य नाही, हेही सिद्ध करून देताय. मग यात आमचा काय दोष ? याशिवाय राज्यात व केंद्रात तुमचेच सरकार आहे. 

काळजी घ्यायला आम्ही समर्थ... 
आमची काळजी करण्यापेक्षा जर तुम्ही तुमच्या ताब्यातील कारखान्याची केली असती तर निश्‍चितच कारखान्याची गाळप क्षमता किमान शंभर ग्रॅमने तरी वाढवली असती, असा टोला लगावून सत्यसिजसिंह पाटणकर म्हणाले, राजकीय गट टिकविण्यासाठी जो भोळा भाबडा ऊस उत्पादक दरवर्षी स्वतःचे लाखो रुपये नुकसान करून ऊस घालतो. त्याला किमान इतर कारखान्यांच्या तुलनेत चांगला दर दिला असता. कामगारांची दरवर्षी कमी होणारी संख्या, पगार व थकीत देणी दिली असती तर बरे झाले असते. त्यामुळे आमची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत. तुम्ही तुमची काळजी करा, असेही श्री. पाटणकर यांनी पत्रकात म्हटले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com