विमानतळावर खासगी प्रयोगशाळांकडून कोरोना चाचणीच्या नावावर प्रवाशांची लूट…

नागपुरात परत आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी करून त्यांच्याकडून ८०० ते ८५०रुपये उकळले जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
विमानतळावर खासगी प्रयोगशाळांकडून कोरोना चाचणीच्या नावावर प्रवाशांची लूट…
Crescent Lab

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर Dr. Babasaheb Ambedkar International Airport खासगी प्रयोगशाळांकडून कोरोना चाचणीच्या नावाखाली प्रवाशांची लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपुरात परत आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी करून त्यांच्याकडून ८०० ते ८५० रुपये उकळले जात असल्याची धक्कादायक बाब कामठी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे भिलगाव अध्यक्ष प्रशांत नायडू Prashant Naidu यांनी ‘सरकारनामा’ला सांगितली.

श्री नायडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर विमानतळावर उतरलेल्या ज्या प्रवाशांनी कोरोना प्रतिबंधक दोन डोस घेतलेले नाहीत, त्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाते आणि त्यांच्याकडून ८०० ते ८५० रुपये बळजबरीने घेतले जातात. विमानतळ प्रशासनाच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू आहे. सरकारकडून कोरोनाच्या चाचण्या निःशुल्क करण्यात येत आहेत. अशा स्थितीत विमानतळावर चाचणीचे पैसे का म्हणून द्यावे. शहराच्या आरोग्याची येवढीच काळजी विमानतळ प्रशासनाला असेल, तर त्यांनी निःशुल्क चाचणी करावी, अशी मागणीही प्रवाशांनी केली आहे. महानगरपालिका प्रशासनाने आपली चमू तेथे नियुक्त करून निशुल्क चाचणी खुशाल करावी, असे प्रवासी सांगतात. 

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत चाचण्यांसाठी लोकांची कशी लूट झाली, हे सर्वांनीच पाहिले. एन्टीजेन आणि आरटी-पीसीआर चाचणीसाठी लोकांनी जिवाच्या भितीने २ ते ४ हजार रुपयांपर्यंतही खर्च केलेले आहे. आता सर्व सुरळीत होण्याच्या मार्गावर असताना विमानतळ प्रशासन चाचणीच्या नावाखाली ‘त्या’ कटू आठवणींना उजाळा देत आहे. नागपूर शहरात तरी कोरोनाची दहशत आता कमी होण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारनेही निर्बंध हळूहळू शिथील करायला सुरूवात केली आहे. अशा स्थितीत ‘क्रीस्केंट लेबॉरेटरी’कडून विमानतळावर सुरू असलेल्या त्यातल्या त्यात ८०५ रुपये घेऊन सक्तीने करीत असलेल्या आरटीपीसीआर चाचणीवर प्रवाशांनी आक्षेप घेतला आहे. 

एका प्रवाशाने चाचणी केल्याची ८५० रुपयांची पावती ‘सरकारनामा’ला उपलब्ध करून दिली. त्यावरील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता, ‘विमानतळ प्रशासनाने आम्हाला आरटीपीसीआर टेस्ट करायला सांगितले आहे. त्यासाठी आम्ही ८५० रुपये आकारत आहोत. घरी जाऊन चाचणी करण्याचे आमचे दर १००० रुपये आहेत. पण विमानतळावर चाचणीसाठी आम्ही ८५० रुपये आकारत असल्याचे संबंधित व्यक्तीने सांगितले.’, या महिलेने आपले नाव सांगण्यास नकार दिला.
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.