दिड वर्षांचा पगार थकला; कामगारांनी पंकजा मुंडेंचा कारखाना बंद केला

एकेकाळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा आशिया खंडात लौकिक होता. दुष्काळ, व्यवस्थापनआदी कारणांनी अलिकडे हा कारखाना अडचणीत आलेला आहे.
Parli suger Factory- Pankaja Munde News- beed
Parli suger Factory- Pankaja Munde News- beed

परळी वैजनाथ : दिड वर्षांपासून वेतन नसल्याच्या कारणाने कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बुधवारी बंद केला. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या कारखान्याच्या अध्यक्ष असून पगार मिळेपर्यंत कारखाना सुरू करणार नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी कायम ऊसतोड मजूरांच्या हिताचे राजकारण केले. पण, तत्कालिन परिस्थितीत राष्ट्रवादी - काँग्रेसला शह देण्यासाठी त्यांनी साखर कारखानदारीतही पाय ठेवले. मजूर आणि कारखानदारी यात सुवर्णमध्य साधण्याची किमयाही त्यांनी करुन दाखविली. एकेकाळी वैद्यनाथ कारखाना आशिया खंडात नावाजला गेला.

परंतु, मागच्या काही वर्षांपासून व्यवस्थापनातील काही दोष, कायम पडणारा दुष्काळ यामुळे कारखाना अडचणीत आलेला आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासाठी अनेक दिवस आंदोलन केले होते. दरम्यान, आताही कर्मचाऱ्यांचे दिड वर्षांचे वेतन थकलेले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दहा दिवसांपूर्वी कारखान्याचे कार्यकारी संचालक दिक्षतलू यांना निवेदन दिले.

थकीत पगार १० दिवसांत खात्यात वर्ग करा अन्यथा आम्ही कारखाना बंद करु असा इशारा दिला होता. दहा दिवस लोटूनही पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळ पासूनच कारखाना बंद केला असून यात वजन काटा व सर्व कार्यालयाचे कर्मचारी, उत्पादन युनिटचे कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.

या संपाबदल कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. कारण पंकजा मुंडे यांनी अनेक अडचणीतून हा कारखाना यंदा सुरू केला, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळालाही होता. मात्र कर्मचाऱ्यांचे पगार मात्र थकीत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांनी हे संपाचे हत्यार उपसले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com