पदवीधरच्या उमेदवारीवरून नाराजी नाही, असली तर ती दूर करू... - Not annoyed with the graduate's candidacy, if so, let's get rid of it | Politics Marathi News - Sarkarnama

पदवीधरच्या उमेदवारीवरून नाराजी नाही, असली तर ती दूर करू...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

एमबीबीएसच्या जागा भरण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने एक प्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असेच सूचित केल्याची टिका पाटील यांनी केली. मराठा आरक्षणावरून आम्ही कुणाचा राजीनामा मागणार नाही, किंवा त्यांनी तो द्यावा, असेही आम्हाला वाटत नाही. पण मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही आमची इच्छा असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

औरंगाबाद ः राज्यातील पदवीधर मतदारसंघात भाजपने दिलेल्या उमेदवारांवरून नाराजी असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे, पण कुणीही नाराज नाही, असलेच तर त्यांची नाराजी दूर करू, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सारवासारव केली. कोअर कमिटीच्या बैठकीत पंकजा मुंडे यांच्या अनुपस्थितीवरून विचारलेल्या प्रश्नावरही त्यांच्या साखर कारखान्याच्या कामामुळे त्या येऊ शकल्या नाहीत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी आणि निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी चंद्रकांत पाटील दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर होते. दरम्यान, त्यांनी मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आढावा घेतला, तसेच शिरीष बोराळकर यांच्या अधिकृत उमेदवारीची घोषणा पत्रकार परिषद घेऊन केली. यावेळी मराठा आरक्षण, पदवीधरच्या उमेदवारीनंतर नाराजीच्या सुरू असलेल्या चर्चा यासह विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, पदवीधर मतदारसंघासाठी आज भाजपने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पक्षाने योग्य उमेदवारांची निवड करून त्यांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही, जर कुणी नाराज झालेच असेल तर त्यांची समजूत काढली जाईल. कुणाला न्याय देणे, किंवा अमूक एक व्यक्ती नाराज झाला असे म्हणणे योग्य नाही. शेवटी तिकीट एक असते आणि मागणाऱ्यांची संख्या जास्त, अशावेळी बाकीचे नाराज होणार हे सहाजिक असते. पण एकदा उमेदवार ठरला की भाजपमध्ये नाराजी राहत नाही.

पुण्यात मेधा कुलकर्णींना डावलण्यात आले का? यावर उमेदवारी मिळालेले संग्राम देशमुख माझे जावाई आहेत का? आणि मेधा कुलकर्णी माझ्या शत्रु आहेत का? असा उलट सवाल पाटील यांनी केला. पंकजा मुंडे या बीडच्या रमेश पोकळे यांच्यासाठी आग्रही होत्या, पण त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्या नाराज आहेत का? यावरही पाटील यांनी यात तत्थ नसल्याचे सांगत साखर कारखान्याच्या कामामुळे पंकजा मुंडे बैठकीला येऊ शकल्या नाहीत, असे स्पष्ट केले.

आम्ही कुणाचा राजीनामा मागणार नाही..

मराठा आरक्षणावर बोलतांना एमबीबीएसच्या जागा भरण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने एक प्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असेच सूचित केल्याची टिका पाटील यांनी केली. मराठा आरक्षणावरून आम्ही कुणाचा राजीनामा मागणार नाही, किंवा त्यांनी तो द्यावा, असेही आम्हाला वाटत नाही. पण मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही आमची इच्छा असल्याचेही पाटील यांनी सांगितले..

लाॅकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या अनेकांवर संकट ओढावले. त्यांचे व्यवसाय बुडाले, उपसामारीची वेळ आली, पण सरकारने त्यांना कवडीची मदत केली नाही. गरीबांसाठी सरकारने एखादे पॅकेज जाहीर करणे गरजेचे होते, पण असे काही झाले नाही. सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल, तर त्यांनी कर्ज काढून गोर-गरीबांना मदत करावी, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख