मोदींना रोखण्यासाठी मजबुत विरोधी आघाडीची गरज, हेच बिहार निकालाचे संकेत.. - The need for a strong opposition front to stop Modi is a sign of the Bihar outcome. More about the | Politics Marathi News - Sarkarnama

मोदींना रोखण्यासाठी मजबुत विरोधी आघाडीची गरज, हेच बिहार निकालाचे संकेत..

जगदीश पानसरे
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

वडील लालू प्रसाद यादव तीन वर्षापासून जेलमध्ये आहेत, आईसह संपुर्ण कुटुंब केंद्र सरकारच्या स्क्रीनिंग खाली आहे, ईडी, इनकमटॅक्स अशा सगळ्या प्रकारे मोदी सरकारने यादव कुटुंबाला त्रास दिला, पण या सगळ्या संकटातून तेजस्वी यांनी मोदी सरकारला धक्का देण्याचे काम या निवडणुकीत केले आहे. हे निकाल म्हणजे एक प्रकारचे संकेत आहेत.

औरंगाबाद ः बिहार निवडणुक निकालाने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, की लोकांनी काॅंग्रेसला नाकारले आहे. मोदी लाट जर रोखायची असेल तर देश पातळीवर काॅंग्रेसला सहभागी करून घेत एक मजबुत विरोधी आघाडी निर्माण करण्याची गरज आहे. तेजस्वी यादव यांनी मिळवलेले यश आणि बिहार निवडणुकीच्या निकालातून हेच संकेत मिळत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. ममता, पटनायक, तेजस्वी यादव किंवा अन्य कुणीही या विरोधी आघाडीचे नेतृत्तव करावे, मी देखील आॅल इंडिया स्तरावरचा नेता आहे, असे म्हणत त्यांनी शरद पवारांचेच नाव कशासाठी घेता, असा चिमटा देखील यावेळी काढला.

प्रकाश आंबेडकर आज औरंगाबादेत आले असतांना त्यांनी बिहार निवडणुकीसह राज्यातील ग्रामपंचयात निवडणुका, मराठा आरक्षण आदी मुद्यांवर आपली मतं मांडली. यावेळी बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले, मोदी सरकारच्या विरोधात जनतेमध्ये रोष आहे हे बिहार निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. देशपातळीवर आता काॅंग्रेसकडे विरोधकांचे नेतृत्व असावे, अशी परिस्थिती राहिलेली नाही, लोकांनी काॅंग्रेसला नाकारले हे देखील या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे.

तेजस्वी यादव यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असून ज्या परिस्थितीत त्यांनी ते मिळवले ते देखील महत्वाचे आहे. वडील लालू प्रसाद यादव तीन वर्षापासून जेलमध्ये आहेत, आईसह संपुर्ण कुटुंब केंद्र सरकारच्या स्क्रीनिंग खाली आहे, ईडी, इनकमटॅक्स अशा सगळ्या प्रकारे मोदी सरकारने यादव कुटुंबाला त्रास दिला, पण या सगळ्या संकटातून तेजस्वी यांनी मोदी सरकारला धक्का देण्याचे काम या निवडणुकीत केले आहे. हे निकाल म्हणजे एक प्रकारचे संकेत आहेत.

आगामी काळात पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. मोदी लाट रोखायची असेल तर देश पातळीवर विरोधकांची एक मजबुत आघाडी तयार झाली पाहिजे. पण त्याचे नेतृत्व काॅंग्रेस सोडून इतरांकडे दिले पाहिजे. काॅंग्रेसचा सहभाग असलेल्या या आघाडीचे नेतृत्व ममता बॅनर्जी, पटनायक, तेजस्वी किंवा इतर कुणीही करावे. शरद पवारांचेच नाव पुढे करण्याचे कारण नाही, मी देखील आॅल इंडिया स्तरावरचा नेता आहे, पण मी तसं कधी बोलंत नाही, असा टोला देखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी लगावला.

कुठलीच निवडणूक पुढे ढकलता कामा नये.

राज्यात किंवा देशात कुठलीच निवडणूक पुढे ढकलणे कायद्याच्या दुष्टीने चुकीचे आहे. अगदी भारत-पाकिस्तान, बांग्लादेश किंवा चीन सोबत युध्द सुरू असले तरी निवडणुका या वेळेवर आणि मुदतीतच घ्यायला हव्यात. निवडणूका पुढे ढकलण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे, त्यासाठी देखील घटनेमध्ये बदल करावे लागतात असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

 

.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख