शिवेंद्रसिंहराजेंच्या मदतीने राष्ट्रवादी आखणार रणनिती

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशीकांत शिंदे, मकरंद पाटील यांनी सर्वांना सामावून घेत बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवेंद्रसिंहराजेंच्या मदतीने राष्ट्रवादी आखणार रणनिती
NCP will formulate a strategy with the help of Shivendraraje; Attention to the role of Udayanraje, Jayakumar Gore

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीला राज्य सरकारने परवानगी दिल्याने सातारा जिल्हा बँकेची कच्ची मतदार यादी तयार करण्यापासूनची प्रक्रिया होणार आहे. तर दुसरीकडे जिल्हा बँकेत पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी विद्यमान अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मदतीने निवडणूक बिनविरोध करण्याची रणनिती आखली जाणार आहे. तर दुसरीकडे भाजपकडून पॅनेलची जुळवाजुळव करताना खासदार उदयनराजे भोसले व आमदार जयकुमार गोरे कोणता डाव टाकणार यावर या निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे. NCP will formulate a strategy with the help of Shivendraraje; Attention to the role of Udayanraje, Jayakumar Gore

सातारा जिल्हा बँकेची निवडणूक विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची राहणार आहे. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीतील दिग्गज नेते करणार आहेत. पण राष्ट्रवादीचे बिनविरोधचे मनसुबे फोल ठरविण्यासाठी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांची भूमिका महत्वपूर्ण राहणार आहे. 

मागील वेळी निवडणूक स्थगित झाली त्यावेळी भाजपने पॅनेल टाकण्याची तयारी सुरू केली होती. आता यावेळेस जिल्हा बँकेत सर्वाधिक मते असलेले विद्यमान अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे राष्ट्रवादी सोबतच राहणार आहेत. त्यांच्या मदतीशिवाय राष्ट्रवादीला ही निवडणूक सोपी होणार नाही. हे ओळखून त्यांनी त्यांची मदत घेऊन निवडणूकच बिनविरोध करण्याची रणनिती आखली जाणार आहे.

मात्र, त्यासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांना एकत्र करून ही निवडणुकीची प्रक्रिया राष्ट्रवादीचे नेते पार पाडणार आहेत. सोसायटी मतदारसंघात यावेळेस अकरा पैकी आठ संचालक हे राष्ट्रवादीचे आहेत. तर काँग्रेसचा एक व भाजपचे दोन संचालक आहेत. यामध्ये काँग्रेसचे संचालक म्हणणून कै. माजी आमदार विलासराव उंडाळकर यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच बँकेची निवडणूक होत असल्याने त्यांच्या मुलाला बँकेवर घेण्याबाबत ही राष्ट्रवादीकडून प्रयत्न होतील. 

दुसरीकडे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना बँकेत येण्यापासून रोखण्यासाठी त्यांचे अनेक ठराव अक्रियाशिल करण्यात आले आहेत. तरीही आमदार गोरे सर्व आयुधे वापरून बँकेत संचालक म्हणून प्रवेश करतील, असेही सांगितले जात आहे. त्यासाठी त्यांनी न्यायालयीन लढाई लढण्याचीही तयारी केली आहे. त्यामुळे त्यांची भूमिका यामध्ये महत्वाची ठरणार आहे. 

उर्वरित संचालकांत आमदार शिवेंद्रसिंहराजेंना मानणारे पाच संचालक आहेत. तसेच इतर संस्थांच्या मतदारसंघातील मते ही त्यांच्याकडेच जास्त आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील संचालकांचा आकडा कमी होणार नाही. तर माजी अध्यक्ष कै. लक्ष्मणराव पाटील यांच्या निधनानंतर मकरंद पाटील यांना संचालक म्हणून घेण्यात आले आहे. तात्यांची दोन्ही मुले संचालक आहेत. त्यामुळे यावेळेस त्यांच्यापैकी एकालाच संचालक म्हणून घेतले जाणार आहे. 

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशीकांत शिंदे, मकरंद पाटील यांनी सर्वांना सामावून घेत बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित खासदार उदयनराजेंनाही एक दोन जागा देऊन समावून घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपकडून पॅनेलचा प्रयत्न झाल्यास दिग्गज नेत्यांना सर्व ठिकाणी उमेदवार मिळविणे अडचणीचे होणार आहे. भाजपकडून जिल्हा बँकेची निवडणूक गांभीर्याने घेतली गेल्यास एक दोन मतदारसंघात निवडणूक लागली जाईल. अन्यथा निवडणूक एकतर्फी महाविकास आघाडी म्हणूनच होईल.

 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in