Narendra Modi, Amit Shah gave relief to Uddhav Thackeray | Sarkarnama

नरेंद्र मोदी, अमित शहांनी दिला उद्धव ठाकरेंना दिलासा 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 2 जून 2020

चक्रीवादळच्या या संकटाशी मुकाबला करण्यासाठी आपण सज्ज आहोत. आम्ही आर्मी, नेव्ही, एअरफोर्सला सतर्क  राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच एनडीआरएफच्या 15 तुकट्या तैनात केल्या आहेत. तसेच आणखी पाच तुकड्या तयार ठेवल्या आहेत.

सातारा : कोरोनापाठोपाठ महाराष्ट्रावर दुसरे चक्रीवादळाचे संकट आले आहे. त्यास तोंड देण्यासाठी सरकार सज्ज आहे. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे माझ्याशी संपर्क करून या संकटाच्या समयी केंद्र सरकार तुमच्या पाठीशी संपूर्ण ताकतीनिशी उभे असून कोणतीही काळजी करू नका, असा दिलासा त्यांनी दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधताना सांगितले. 

कोरोनापाठोपाठ महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीला उद्या (बुधवारी) दुपारपर्यंत चक्रीवादळ धडकण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर कोकण
किनारपट्टी तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील जनतेने कोणती दक्षता घ्यावी, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. 

ज्या प्रमाणे आपण सर्वांनी कोरोनाचे संकट धैर्याने रोखून धरले, आता ते आपण परतवून लावणार आहोत. त्याबद्दल तुमच्या धैर्याला जिद्दीला मी सलाम करतो. आता
दुसरे नैसर्गिक संकट चक्रीवादळाचे आले असून त्यावर धैर्याने मात करण्यासाठी संकटाच्या छाताडावर चाल करून जाऊ त्यातून धैर्याने बाहेर पडूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनानंतर हे दुसरे नैसर्गिक संकट चक्रीवादळच्या माध्यमातून येत आहे.

हे वादळ आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी हवेत विरावे, असे वाटते. पण उद्या (बुधवारी) दुपारपर्यंत ते अलिबागच्या किनाऱ्यावर धडकण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम अलिबाग, पालघर ते सिंधुदूर्ग या परिसरात दिसणार आहे. या संकटाशी मुकाबला करण्यासाठी आपण सज्ज आहोत. आम्ही आर्मी, नेव्ही, एअरफोर्सला सतर्क  राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच एनडीआरएफच्या 15 तुकट्या तैनात केल्या आहेत. तसेच आणखी पाच तुकड्या तयार ठेवल्या आहेत.

सर्वात महत्वाचे म्हणजे चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे संपर्क केला. तसेच या संकटाच्या समयी केंद्र सरकार तुमच्या पाठीशी संपूर्ण ताकतीनीशी उभे आहे, असे सांगितले आहे. त्यानंतर दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याशी संपर्क करून केंद्र सरकार तुमच्या सोबत असून कोणतीही काळजी करू नका, असा दिलासा दिला आहे.

तीन तारखेपासून पुनश्‍च हरी ओम..ला आपण सुरवात करणार होतो. पण या निसर्गनिर्मित दुसऱ्या संकटाशी आपण सामना करणार आहोत. कोकण  किनारपट्टीसाठी उद्या (बुधवार) आणि परवा (गुरूवार) हे दोन दिवस महत्वाचे आहेत. दोन्ही दिवस सर्वांनी घरातच राहणे योग्य होणार आहे. जी कार्यालये सुरू केली आहेत, ती दोन दिवस बंद राहतील. कारण चक्रीवादळात घराबाहेर न पडणे आपल्या हिताचे नाही.

आपल्याला मनुष्यहानी होऊन द्यायची नाही, अशा पद्धतीचे नियोजन केले आहे. सर्वांनी दूरदर्शन, टिव्हीवरील शासनाकडून तसेच जिल्हा प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. अफवांवर विश्‍वास ठेऊन नका. स्वत: सूरक्षित राहून दुसऱ्यांना मदत करू शकता. घाबरून जाऊन वेडेवाकडे पाऊल टाकू नका, असा सल्लाही त्यांनी कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रातील जनतेला दिला. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख