बाळासाहेब अशा पुत्राला काय म्हणत असतील!

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याची बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. पण त्यांचे पुत्र उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असूनही नामांतर होत नाही. हे दुर्देवी आहे.
Narayan Rane slams CM Uddhav Tharey on Sambhajinagar issue
Narayan Rane slams CM Uddhav Tharey on Sambhajinagar issue

मुंबई : औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याची बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. पण त्यांचे पुत्र उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असूनही नामांतर होत नाही. हे दुर्देवी आहे. बाळासाहेब ठाकरे वरून पाहत असतील तर अशा पुत्राला काय म्हणत असतील, अशी खरमरीत टीका भाजपचे नेते नारायण राणे यांनी केली. तसेच आताची शिवसेना वेगळी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

तीन कृषी कायद्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्रितपणे आंदोलन करणार आहेत. त्याअनुषंगाने राणे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेसह सर्वच पक्षांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, उध्दव ठाकरे हे लाचारी करून मुख्यमंत्री झाले आहेत. ते मातोश्रीच्या पिंजऱ्यातून बाहेरच पडत नाहीत. त्यांनी या पिंजऱ्यातून बाहेर पडावं. मुख्यमंत्री असले तरी त्यांना सरकारी यंत्रणांना हाताळण्याचे ज्ञान नाही. सरकार चालविण्याबाबत ते अज्ञानी आहेत. केवळ 'कलेक्शन' हा शिवसेनेचा एककलमी कार्यक्रम आहे, असे राणे म्हणाले.

भाजीपाला मातोश्रीवर विकायचा का...

कृषी कायद्याविरोधात शरद पवार आणि मुख्यमंत्री रस्त्यावर उतरणार आहेत. यावर बोलताना राणे म्हणाले, शरद पवार कृषीमंत्री होते. मग त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? पंतप्रधानांनी केलेले कायदे शेतकरी हिताचेच आहेत. शेतकऱ्यांना कुठेही आपला माल विकता येणार आहे. मग विरोध कशासाठी? शेतकऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन भाजीपाला विकायचा का? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. भाजपचे यश पाहवत नसल्यानेच आंदोलन केले जात आहे. ही राजकीय खेळी आहे, असेही ते म्हणाले.

भाजपचाच दावा खरा...

ग्रामपंचायती निवडणुकीतील यशावरून भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपणच राज्यात नंबर वन असल्याचे म्हटले आहे. यावर राणे यांनी भाजपचाच दावा खरा असल्याचे सांगितले. आम्हा हेरीफेरी करण्याची गरज नाही. आमच्याविरोधात सगळे आहेत. पण त्यांची ताकद नाही. आमचे ग्रामपंचायत सदस्य ते त्यांचे घेऊ शकत नाहीत. असे झाल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशाराही राणे यांनी दिला.

शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत राजभवनावर मोर्चा...

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारतर्फे मुंबईच्या आझाद मैदानात तीन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ता. 23, 24, 25 रोजी हा कार्यक्रम होणार आहे असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाविकास आघाडीचे नेते यावेळी उपस्थित राहणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.  

विविध संघटनांतर्फे या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. ता. 25 जानेवारी रोजी आझाद मैदान ते राजभवनपर्यंत मोर्चोचे आयोजन करण्यात आले आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते या वेळी उपस्थित राहणार आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचा शेतकरी कायद्याला विरोध आहे, असे मलिक यांनी सांगितले.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com