शेतकऱ्यांनी मोदी सरकारची चांगलीच जिरवली : प्रवीण कुंटे 

मोदी सरकारने आंदोलक शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी बोलावले व कृषी कायदे कसे शेतकऱ्यांचे हित जपणारे आहेत यांचे गोडवे गात त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा तसूभरही परिणाम शेतकऱ्यांवर झाला नाही व शेतकरी नेते सरकारचं चहा-पाणी घेताच बैठकीतून नाराज होऊन निघून गेले.
Pravin Kunte Patil
Pravin Kunte Patil

नागपूर ः आम्हीं करू तीच पूर्व दिशा, ही भाजप सरकारची घमेंड उतरवून हम करे सो कायदा चालणार नाही, हे शेतकऱ्यांनी मोदी सरकारच्या लक्षात आणून दिले आहे. मोदी सरकारची जिरवताना त्यांना गुडगे टेकायला भाग पाडलं, हे चित्र आज स्पष्ट दिसतं आहे. त्यामुळे आता तरी केंद्र सरकारने अतिरेक करू नये, आणि अत्याचारी कृषी विधेयक मागे घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील केली आहे. 

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे तीन कृषी कायद्यांमध्ये आठ दुरुस्त्या करण्याबाबत विचार होऊ शकतो, अशी तडजोडीची भूमिका केंद्र सरकारने घेतली. मात्र, तिन्ही कायदे शेतकरीविरोधी असून ते कायदेच रद्द करावेत, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. विज्ञान भवनात दीर्घकाळ चाललेली  प्रथम बैठक निष्फळ ठरली. मोदी सरकारने पास केलेले तीनही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. मोदी सरकारने आंदोलक शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी बोलावले व कृषी कायदे कसे शेतकऱ्यांचे हित जपणारे आहेत यांचे गोडवे गात त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा तसूभरही परिणाम शेतकऱ्यांवर झाला नाही व शेतकरी नेते सरकारचं चहा-पाणी घेताच बैठकीतून नाराज होऊन निघून गेले.

शिवसेनेनं सामनामध्ये आजच्या अग्रलेखात मोदी सरकारच्या नीतीची चिरफाड करताना मोदी सरकारवर टिका केली ती वाजवीचं होती. मोदी सरकारने नोटाबंदी पचवून ढेकर दिला. जीएसटीने केलेला सत्यानाश पचवला. बेरोजगारी, महागाईवर हिंदू-मुसलमान भाडण, हिंदुस्थान- पाकिस्तानचा उपाय दिला. लॉक डाऊनने जेरीस आलेल्या जनतेला अयोध्येत राममंदिराचे तबक दिले. पण पंजाबच्या शेतकऱ्यांसमोर त्यांचे कोणतेही ‘लॉलीपॉप’ चालले नाही. हे यश पंजाबच्या शेतकऱ्यांच्या एकीत दिसलं. भाजपच्या सायबर सेलने शेतकऱ्यांच्या एकजुटीत हर तऱ्हेनं फूट पाडण्याचे कारस्थान सुरू केले आहेच. हरियाना सीमेवर वृद्ध शेतकऱ्यांना पोलीस चोपत असल्याचे फोटो व्हायरल होताच भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधींना टार्गेट करत ते खोटारडे असल्याचा कांगावा केल्याचेही कुंटे पाटील म्हणाले. 

‘हिंदुस्थानातील सर्वात बदनाम विरोधी पक्षनेत्यांपैकी एक’ अशी राहुल गांधींची संभावना करताच ट्विटरने मालवीय यांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली व शेतकऱ्यांना पोलीस मारत असल्याचा व्हिडीओच प्रसिद्ध केला. भाजपचा आयटी सेल त्यामुळे तोंडघशी पडला. दुसरे प्रकरण मुंबईस पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या भाजपच्या बेमुर्वत आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या नटीचं. शेतकरी आंदोलनात भाग घेणाऱ्या एका वृद्ध आजीला या मूर्ख नटीने शंभर रुपये रोजावर काम करणारी शाहीन बागवाली ठरवले. याबद्दल वृद्ध शेतकरी महिलेनं या नटीला चांगलंच बजावलं. कांगावा करणाऱ्या नटीचे हे प्रकरणसुद्धा खोटे ठरले व त्या बेताल नटीला माघार घ्यावी लागली, यावरून तरी केंद्र सरकारने धडा घ्यावा. 

एवढंच नव्हे तर त्या वृद्ध आजींनी या नटीला सुनावल देखील. आपली जमीन आहे आणि या नटीने माझ्या शेतात काम करावे. मी तिला ६०० रुपये देते. तिने कापसाची एक गोणी उचलून दाखवावी, अशा शब्दांत या आजींनी बेताल नटीला चांगलंच फैलावर घेतलं. अशी अनेक प्रकरणे शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत रोजच घडत आहेत. सरकारच्या व भाजप सायबर सेलचं  भांड फोडताना ‘मोदी है तो मुमकीन है’ या घोषणेचा फज्जा उडताना दिसत आहे. गृहमंत्री शहा यांनी शेतकऱ्यांना वारंवार आंदोलन माघार घेण्याचं आवाहन केलं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. गुंडगिरी चालणार नाही, हे एव्हाना शहांच्या लक्षात आलं असावं, असेही कुंटे पाटील म्हणाले. 

पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर यांना चर्चेतून तोडगा निघावा यासाठी दिल्लीत पाचारण केले गेले. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील एकजूट हेच शेतकऱ्यांच्या यशाचं गमक आहे. पंजाब हरियाणातील गायक, कलावंत, खेळाडू यांनी त्यांचे राष्ट्रीय पुरस्कार केंद्राला परत करायचे ठरवलं असून भाजपा सरकारला सर्वांनीचं धारेवर धरले आहे. भाजपा आणि त्यांचे भक्त हे या सर्वांची खिल्ली उडवत आहेत व त्यांना पुरस्कार वापसी गँग म्हणत आहेत. पण हे करून भाजपा जनतेच्या मनातून उतरत आहेत हे त्यांच्या नेत्यांना सत्तेच्या माजा मुळेच.
 

पद्मश्री, पद्मभूषण, अर्जुन पुरस्कार परत करून ही मंडळी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. भाजप सरकारसमोर मोठंच आव्हान उभं करीत आहेत. भाजपने कितीही दमन करण्याचा प्रयत्न केला तरी कडाक्याच्या थंडीतही पंजाबच्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारला घाम फोडला. आंदोलन मागे घ्यायचं सोडाच. पण ते अधिक जहाल आणि तीव्र होताना दिसत आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन बदनाम करण्याच्या मोहिमा राबवल्या गेल्या, पण त्या भाजपावरच उलटल्या. गेल्या सहा वर्षांत सुपर पॉवर असणाऱ्या मोदी सरकारची अशी भयंकर कोंडी आणि फजिती कधीच झाली नव्हती, असे प्रवीण कुंटे म्हणाले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com