जिल्हाधिकाऱ्यांच्या एकाधिकाशाहीवर आमदार महेश शिंदेंची नाराजी

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यासाठी घेतलेल्या निर्णयांवरुन जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींमध्ये जुंपण्याची शक्‍यता दिसते. ग्रामसमित्या सक्षम करण्याबरोबरच अन्य उपायासंबंधी आता थेट मुख्यमंत्र्यांपुढे गाऱ्हाणे मांडले जाणार आहे.
MLA Mahesh Shinde
MLA Mahesh Shinde

सातारा : जिल्हा प्रशासनाचे दररोज एक नवा आदेश निघत आहे. सकाळचा आदेश संध्याकाळी बदलत आहेत. चुकीच्या निर्णयांचा ताण हा पोलिस प्रशासन व आरोग्य विभागावर येत आहे. ग्रामसमित्या सक्षम नसल्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय करताना उणीवा दिसत आहेत. जिल्हा प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेऊन काम करावे, असे मत आमदार महेश शिंदे यांनी केले आहे. या संदर्भात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. 

या संदर्भात कोरेगावचे शिवसेनेचे आमदार शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, ग्रामस्तरीय समित्यांपासून ते विलगीकरणापर्यंतचे जिल्हा प्रशासनाचे अनेक निर्णय गोंधळलेल्या अवस्थेत घेतलेले दिसतात.

ग्रामस्तरीय समित्या करण्यासाठी आपण जिल्हा प्रशासनाला काही दुरुस्त्या सुचवल्या होत्या. परंतु, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. ग्रामस्तरीय समितीमध्ये सत्ताधारी व विरोधकांचे प्रमुख असणे गरजेचे होते. परंतु, गाव चालवणारे प्रमुखच या समितीतून दूर ठेवण्यात आले. त्यामुळे आज गावांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाय कमी पडताना दिसतात. बाहेरगावाहून येणारे लोक स्थानिक समितीचे ऐकण्याच्या मानसिकतेत नाहीत. ग्रामस्तरीय समिती सक्षम असलेल्या गावामध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना अन्यत्र विलगीकरण करण्यात येत आहे. 

घरात विलगीकरण करण्याचे तोटे होलेवाडी व भीमनगर (ता. कोरेगाव) या ठिकाणी पाहत आहोत. होलेवाडीतील पेशंट महिला आणि गारवडीतील (ता. खटाव) महिला या दोघी एकाच गाडीतून मुंबईवरून आल्या होत्या. परंतु, गारवडीत ग्रामस्तरीय समितीने येणाऱ्या लोकांची व्यवस्था शाळेमध्ये केली. त्यामुळे विलगीकरणातील महिलाच कोरोना पॉझिटिव्ह निघाली. परंतु, होलेवाडीत गावकऱ्यांनी शाळेत विलगीकरण कक्ष असतानाही या महिलेसह 12 जणांना घरामध्ये पाच दिवस ठेवले होते. त्याचा वाईट परिणाम आज दिसून येत आहे. 

कोरेगाव मतदारसंघामध्ये आम्ही रात्रं-दिवस कष्ट करून बाहेरून येणाऱ्या लोकांना गावातील लोकांच्या कमीत कमी संपर्कात कशा पद्धतीने ठेवता येईल, याचा प्रयत्न करतोय. परंतु, ठराविक लोकांच्या हट्टापायी बाहेर येणारे लोक हे गावामध्ये बिनधास्त फिरत लग्नसमारंभ, पार्ट्या, बाजारपेठेत फिरणे अशा पद्धतीचे उद्योग करत आहेत. भविष्यात बाहेरून आणखी लोक येणार आहेत. गावातील सर्वांनी एकत्र येऊन या सर्वांची सोय चांगल्या पद्धतीने गावाबाहेर केली, तर निश्‍चित आपण कोरोनाचा मुकाबला करू शकतो. 


...या प्रश्‍नांची उत्तरे द्या 
महसूल विभागाचे सर्व कर्मचारी हे दोन महिन्यांमध्ये किती वेळा त्यांना नेमून दिलेल्या गावात गेले, याची चौकशी गावातील लोकांचे जबाब घेऊन करावी. फक्त स्वतःच्या घरी थांबून जिल्हा प्रमुखांची कॉन्फरन्स अटेंड करून धन्यता मानणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई होणार का? ग्रामसमित्यांना अधिकार देऊन त्यांची पुनर्रचना करणार का? जाणीवपूर्वक चुकीचे निर्णय घेऊन गावात वेठीस धरलेल्या ग्रामसमित्यांवर कारवाई करणार का? आदी प्रश्‍नही महेश शिंदे यांनी उपस्थित केले आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com