रुग्णांना रेमडेसिव्हर मिळावे म्हणून शिवसेना आमदाराने ९० लाखांची एफडी मोडली..

जिल्हा रुग्णालयासाठी रेमडेसिव्हर इंजेक्शन मागवण्यासाठी वितरकांना मोठी रक्कम गुंतवावी लागते.
Shivsena Mla Bangar Broke the Fd For Rdmdesiver Injection news Hingoli
Shivsena Mla Bangar Broke the Fd For Rdmdesiver Injection news Hingoli

हिंगोली : शासकीय अडचणींमुळे थेट रेमडेसिव्हर इंजेक्शनाची विक्री करता येत नसल्याने शिवसेना आमदार संतोष बांगर मदतीसाठी सरसावले. त्यांनी स्वतःची एफडी मोडून पाच  हजार रेमडेसिव्हर इंजेक्शन खरेदीसाठी खासगी वितरकाला ९० लाखांची रक्कम उपलब्ध करून दिली. त्यामुळे लवकरच जिल्ह्याला पाच हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मिळणार आहेत. या निर्णयामुळे मृत्यूशी झुंज देणाऱ्या अनेक रुग्णांना जीवदान मिळू शकेल.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेमडेसिव्हर इंजेक्शन, आॅक्सीजन व बेडचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. यामुळे अनेक कोरोना रुग्णाना आपले प्राण गमवावे लागत आहेत. हिंगोली जिल्ह्यात देखील अशीच काहीशी परिस्थिती पहायला मिळते. गेल्या दोन महिन्यांपासून  शिवसेना आमदार संतोष बांगर कोरोनाबाधित रुग्णांना मदत करत आहेत. 

शासकीय व खासगी रुग्णालयातील बाधित रुग्णांची भेट घेऊन त्यांना आवश्यक ती मदत करण्यावर त्यांचा भर आहे. मात्र मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात ऑक्सिजनसह रेमडेसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बांगर यांनी पुढाकार घेतला आहे.

जिल्हा रुग्णालयासाठी रेमडेसिव्हर इंजेक्शन मागवण्यासाठी वितरकांना मोठी रक्कम गुंतवावी लागते. ही रक्कम शासनाकडून वेळत मिळाली नाही तर त्याच्या व्याजाचा मोठा भुर्दंड त्या वितरकाला सोसावा लागतो. त्यामुळे ही जोखीम घ्यायला कुणी धजावत नाही. परिणामी आवश्यकता असूनही रेमडेसिव्हर इंजेक्शन मिळत नाही.

आमदार बांगर यांना जेव्हा हे कळाले तेव्हा त्यांनी रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी ही जोखिम घेण्याचा निर्णय घेतला. स्वतःची ९० लाखांची एफडी मोडून त्यांनी खाजगी वितरकाला ही रक्कम उपलब्ध करून दिली. यातून आता  पाच हजार रेमडेसिव्हर इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत. इंजेक्शनच्या पुरवठ्यानंतर संबंधित वितरकास जिल्हा प्रशासन जेव्हा निधी देईल, तेव्हा ही रक्कम आमदार  बांगर यांना मिळणार आहे.

बांगर यांच्या या मदतीमुळे शकडो कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा मिळणार असून उद्या सोमवारपासून  प्रत्यक्ष इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत.  कोरोनामुळे अनेक कुटुंबावर संकट कोसळले आहे. आपले नातेवाईक, आप्तेष्ठ मृत्यूशी झुंज देत असतांना त्यांना वाचवण्यासाठी सुरू असलेली त्यांची धडपड पाहतो. त्यांचे हाल पहावत नाहीत. त्यांना औषध गोळ्या वेळेवर मिळाव्यात यासाठी माझा प्रयत्न आहे. अनेकांशी या विषयावर बोललो तेव्हा इंजेक्शनच्या बाबतीतली अडचण कळाली. ती दूर करण्याचा प्रयत्न केला, असे बांगर म्हणाले. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com