आमदार झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत मिटकरींनी करून दाखवलं! - MLA Amol Mitkari did it in the first election after becoming an MLA | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत मिटकरींनी करून दाखवलं!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 18 जानेवारी 2021

अकोला जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या कुटासा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलची 13 पैकी 10 जागा जिंकत एकहाती सत्ता

अकोला : अकोला जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या अकोट तालुक्यातील कुटासा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी वर्चस्व मिळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलने 13 पैकी 10 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळविल्याचे निकालांवरून स्पष्ट होत आहे. आमदार झाल्यानंतर त्यांनी पहिल्याच निवडणुकीत त्यांनी बाजी मारली.

मिटकरी यांचे हे गाव असल्याने निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. आमदार रणधीर सावरकर यांनी त्यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. मिटकरींनी कुटासा गावाच्या निवडणुकीत सर्व 13 जागांवर उमेदवार उभे केले होते. राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलशिवाय इतर तीन पॅनलही रिंगणात होते. यात काँग्रेसचा देशमुख गट आणि भाजपचा विजयसिंह सोळंके यांचा गट, वंचित बहुजन आघाडी, युवक काँग्रेसचा कपील ढोके गट आणि शिवसेनेच्या संतोष जगताप यांचेही पॅनल रिंगणात होते. 

गावात एकूण 46 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने मोठी चुरस पाहायला मिळाली. चुरशीच्या लढतीत मिटकरी यांच्या पॅनेलने बाजी मारल्याचे दिसते. इतर पक्षाच्या पॅनेलमधील उमेदवारांना धूळ चारत त्यांनी 13 पैकी 10 जागा जिंकल्या आहेत. 

जनतेतून निवडूण न आलेल्या मिटकरी यांना ग्रामपंचायत निवडणुकीत धडा मिळेल, अशी टीका त्यांच्यावर होत होती. पण मिटकरी यांनी एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना धूळ चारली आहे. आमदार झाल्यानंतर ही त्यांची पहिलीच निवडणुक होती. त्यामुळे जिल्ह्यासह संपुर्ण राज्याचे लक्ष या निवडणूकीच्या निकालाकडे लागले होते.

भाजपकडे सहा हजारांहून अधिक ग्रामपंचायती

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली असून 14 हजार पैकी 6 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये आघाडी घेतली आहे. राज्यात भाजपच नंबर एकचा पक्ष असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

तीन पक्ष एकत्र येऊनही भाजपला घवघवीत यश मिळाले. साम-दाम-दंड या सगळ्याचा वापर त्यांनी केला. पण तरीही ते भाजपला रोखू शकले नाहीत, असे त्यांनी सांगितले. 

चंद्रकांत पाटलांच्या गावात शिवसेनेचा झेंडा 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर (ता. भुरदगड, जि. कोल्हापूर) ग्रामपंचायतींवर शिवसेनेने आपला भगवा झेंडा फडकवला आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखालील या पॅनेलाला विरोध करण्यासाठी भाजप, कॉंग्रेस व राष्ट्रवादीने केलेले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. 

भास्कर पेरे पाटलांच्या मुलीचा पराभव 

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या औरंगाबाद तालुक्यातील पाटोदा या आदर्श ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल हाती आला आहे. गेली पंचवीस वर्ष पाटोदा ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता असलेले माजी सरपंच व पाटोदा गावच्या विकासाचे शिल्पकार भास्कर पेरे पाटील यांची मुलगी अनुराधा पेरे पाटील निवडणुकीत उभी होती. परंतु तीन जागांसाठी मतदान झालेल्या निवडणुकीचा निकाल हाती आला तेव्हा अनुराधा पाटील या पराभूत झाल्या आहेत. 

Edited By Rajanand More
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख