सेझसाठी संपादित जमिनी केल्या परत; शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश 

2010 मध्ये खंडाळा तालुक्‍यातील सात गावांच्या सुमारे 4500 एकर जमिनीवर शिक्के मारले. विशेष म्हणजेत्यानंतर मधल्या काळात शेतकरी वगळता केवळ गुंतवणूकदारांच्या जमिनींचे शिक्के निघाले, तसेच आजपर्यंत औद्योगिकीकरण व कॅनॉल, महामार्ग रुंदीकरण यासाठी अनेक वेळा येथील शेतकऱ्यांनी मुकाट्याने जमिनी दिल्या. मात्र, त्यांचा परतावा, मोबदला व रोजगार मिळाला नाही.
MIDC Khandala
MIDC Khandala

खंडाळा (जि. सातारा) : गेल्या चार वर्षांपासून उपोषण, मोर्चा व बैठका झाल्यानंतर अखेर खंडाळा येथील विशेष आर्थिक क्षेत्रांतंर्गत (सेझ)  एमआयडीसी टप्पा क्रमांक तीनसाठी भूसंपादन केलेल्या जमिनी वगळल्यात आल्याचा शासकिय आदेश आला आहे. त्यामुळे खंडाळा तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांच्या संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. 

मात्र, आंदोलनात आग्रही असणाऱ्या शिवाजीनगर गावाचे 408.1 हेक्‍टर हे संपूर्ण क्षेत्र आणि भादे गावातील काही शेतकऱ्यांची जमीन वगळण्यात आली नाही, तसेच टप्पा क्रमांक एक व दोनमधील केसुर्डी येथील पर्यायी रस्ते व मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे थोडी खुशी थोडा गम अशी स्थिती झाली. 

शासनाच्या या आदेशात खंडाळा तालुक्‍यात औद्योगीक क्षेत्र (सेझ) टप्पा तीनसाठी भूसंपादित होणारे सहा गावांतील 787 गटांतील 961 हेक्‍टर 79 आर क्षेत्र औद्योगिक क्षेत्रातून वगळण्यात आले आहे. दरम्यान, औद्योगिकीकरण टप्पा क्रमांक तीनमध्ये शेतकऱ्यांच्या बागायती व जिरायती जमिनी औद्योगिक प्रकल्पांसाठी संपादित करण्यात येऊ नयेत, यासाठी खंडाळा तालुका शेतकरी कृती समिती व शेतकरी संघटना गेली चार वर्ष संघर्ष करत आहे. 

2010 मध्ये तालुक्‍यातील सात गावांच्या सुमारे 4500 एकर जमिनीवर शिक्के मारले. विशेष म्हणजे त्यानंतर मधल्या काळात शेतकरी वगळता केवळ गुंतवणूकदारांच्या जमिनींचे शिक्के निघाले, तसेच आजपर्यंत औद्योगिकीकरण व कॅनॉल, महामार्ग रुंदीकरण यासाठी अनेक वेळा येथील शेतकऱ्यांनी मुकाट्याने जमिनी दिल्या. मात्र, त्यांचा परतावा, मोबदला व रोजगार मिळाला नाही.

ही बाब लक्षात आल्यानंतर एमआयडीसी प्रकल्प, कृष्णा खोरे व महसूल विभागांकडे न्याय मागणीसाठी खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृती समितीच्या माध्यमातून नऊ ऑगस्ट २०१६ मध्ये खंडाळा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले. त्यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे, नितीन बानगुडे-पाटील व आमदार मकरंद पाटील यांच्यासह अनेकांनी उपोषणस्थळी भेटी देऊन प्रश्न मार्गी लावण्याची आश्‍वासने दिली.

पण नंतर समाधानकारक तोडगा झाला नाही. त्यानंतर मंत्री व आमदारांसोबत मुंबईत मंत्रालयात अनेक बैठका झाल्या. यामध्ये तोडगा निघत नसल्याने 12 जानेवारी 2019 ला खंडाळा ते मंत्रालय (मुंबई) या मार्गावर शेतकरी बचाव कृती समितीने पायी अर्ध नग्न आंदोलन केले. हा मोर्चा 22 जानेवारी 2019 रोजी मंत्रालयावर धडकला. त्या वेळी तालुक्‍यातील केसुर्डी, खंडाळा, बावडा, म्हावशी, अहिरे, मोर्वे, भादे व शिवाजीनगर या गावातील सुमारे 150 शेतकरी सहभागी झाले होते.

यावेळी तत्काळ बैठक लावून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मोर्चाच्या मागण्या मान्य करून त्यावर कार्यवाही करण्याचे लेखी आश्‍वासन दिले. त्यातूनच पुढे टप्पा क्रमांक तीन रद्द करण्याची प्रमुख मागणी मान्य झाली; परंतु शिवाजीनगर येथील संपूर्ण क्षेत्र आणि भादे गावातील काही शेतकऱ्यांची जमीन वगळण्यात आली नाही, तसेच टप्पा क्रमांक एक व दोनमधील केसुर्डी गावातील सर्व मागण्या प्रलंबित आहेत. यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये आंदोलन करूनही काहीशी नाराजीची किनार निर्माण झाली. 


सेझ टप्पा तीनमधून सहा गावांतून वगळलेले क्षेत्र हेक्‍टरमध्ये : 
 अहिरे - 242.7, बावडा - 62.7,  खंडाळा - 16.99,  मोर्वे - 388.62,  भादे - 108.40, म्हावशी - 143.64. एकूण गट - 787 व क्षेत्र 961.795 हेक्‍टर. 

"औद्योगिक टप्पा क्रमांक एक व दोनमध्ये येणाऱ्या केसुर्डी गावातील सर्व मागण्या प्रलंबित आहेत. शिवाजीनगर आणि भादे गावांतील काही शेतकऱ्यांची जमीन वगळण्यात आली नाही. 15 टक्‍के जमीन परतावा, पर्यायी रस्ते, भूमिपुत्रांना रोजगार, फसवणुकीवर फौजदारी गुन्हा दाखल करणे अशा मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांची अडचण दूर होईपर्यंत लढा सुरूच ठेवणार आहे.'' 

- खंडाळा तालुका शेतकरी बचाव कृती समिती 

सातारा सातारा सातारा 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com