खडसेंचा राष्ट्रवादीतील प्रवेश पक्षाला बळकटी देणारा ठरेल.. - Khadse's entry into the NCP will strengthen the party. | Politics Marathi News - Sarkarnama

खडसेंचा राष्ट्रवादीतील प्रवेश पक्षाला बळकटी देणारा ठरेल..

दत्ता देशमुख
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

वडील दिवंगत पंडित अण्णा मुंडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पारंपरिक भागवत कथा सप्ताह सुरू आहे. त्यामुळे आपण परळीत आहोत. अन्यथा एकनाथ खडसेंच्या स्वागताला उपस्थित राहिलो असतो, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

बीड : ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशामुळे मी आनंदी असून त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला आणखी बळकटी मिळणार आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा पक्षातील माझ्या सारख्या तरुणांना फायदा होईल, असे मत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

भाजपमधील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज दुपारी मुंबईत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पक्ष कार्यालयातील कार्यक्रमात आपली कन्या व समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे काही मंत्री गैरहजर असल्याने राज्यभरात चर्चेला उधाण आले होते. यावर शरद पवार यांनी स्वतःच स्पष्टीकरण देत या चर्चेत तथ्य नसल्याचे सांगितले.

या पार्श्वभूमीवर प्रवेश सोहळ्याला हजर राहू न शकलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशा बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या, तसेच आपल्या गैरहजेरीचे कारणही स्पष्ट केले. मुंडे म्हणाले, एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या समवेत आयुष्यातील मोठा काळ घालवत पक्षाला बळ दिले. अनेक आमदार - खासदार निवडून आणले. त्यांनी पक्ष संघटन वाढवले. परंतु, त्यांच्या सारख्या लोकनेत्यावर भाजपने व्यक्तिगत व राजकीय असा दुहेरी अन्याय केला. 

भाजपने त्यांच्याबाबत केलेला प्रकार अजिबात योग्य नव्हता. सामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून एकनाथ खडसेंची ओळख आहे. त्यांच्या पूर्वीच्या पक्षात असताना मी देखील त्यांच्यासोबत काम केलेले आहे. ४० वर्षांपेक्षा प्रदीर्घ राजकीय व सामाजिक कारकीर्द असलेल्या एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस  प्रवेशाने पक्षाला नक्कीच बळ मिळेल, असा आशावाद व्यक्त करतांनाच त्यांच्या प्रवेशामुळे माझ्या सारख्या तरुण कार्यकर्त्यांना त्यांच्या या अनुभवाचा फायदा होईल, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

वडिल दिवंगत पंडित अण्णा मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित सप्ताहानिमित्त आपण परळीत आहोत. अन्यथा त्यांच्या स्वागताला हजर राहीलो असतो असेही मुंडे यांनी सांगितले. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाने भाजपचा खान्देशातील मोठा गड ढासळला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना नक्कीच न्याय मिळेल असा विश्वासही मुंडे यांनी व्यक्त केला.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख