मोदी यांच्या जन्मदिनी बेरोजगार दिवस पाळणे चुकीचे..

पंतप्रधानांच्या जन्मदिनी त्यांच्या विरोधात हॅशटॅग चालवणे किंवा मिम वापरणे आपल्या भारतीय संस्कृतीला साजेसे नसून एकप्रकारे देशाच्या पंतप्रधान पदाचा अवमानच आहे," अशी पोस्ट आमदार रोहित पवार यांनी फेसबुकवरून शेअर केली आहे.
collage (46).jpg
collage (46).jpg

पुणे : "ज्या युवाशक्तीच्या जोरावर आपण महासत्ता बणण्याचं स्वप्न बघत होतो, आज तीच युवाशक्ती बेरोजगारीच्या भयंकर संकटात अडकली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला, मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त समाज माध्यमातून राष्ट्रीय बेरोजगार दिवस पाळला गेला याचा मला खेद वाटतो, देशाच्या पंतप्रधानांच्या जन्मदिनी त्यांच्या विरोधात हॅशटॅग चालवणे किंवा मिम वापरणे आपल्या भारतीय संस्कृतीला साजेसे नसून एकप्रकारे देशाच्या पंतप्रधान पदाचा अवमानच आहे," अशी पोस्ट आमदार रोहित पवार यांनी फेसबुकवरून शेअर केली आहे. 

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात...

विशेषतः काल सोशल मीडियावर हॅशटॅग चालवणारे तसेच मिम वापरणारे हे ट्रोलर्स नसून वास्तविक जीवनात बेरोजगारीच्या विळख्यात अडकलेली युवा पिढी होती. परंतु काल जे समाज माध्यमांवर घडलं ते चुकचं आहे पण यातून बेरोजगारी हा देशातील युवकांच्या समोरचा मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे युवकांचे नैराश्य वाढलेलं दिसून आलं. 

जागतिक कामगार संघटनेनुसार कोरोना काळात जवळपासस ४१ लाख युवकांचे रोजगार गेले आहेत. सीएमआयच्या अहवालानुसार गेल्या वर्षभरात २.१० कोटी लोकांचे पगारी जॉब गेले असून आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वाधिक सुमार कामगिरी आहे. 

देशातील युवक शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत, त्यांना नोकऱ्या मात्र मिळत नाहीत, अशी दुर्दैवी परिस्थिती आज ओढवली आहे. दरवर्षी दीड कोटी युवक हे देशाच्या वर्कफोर्स मध्ये दाखल होत असतात, परंतु ६५  ते ७५ % युवकांना अपेक्षित कौशल्य नसल्याने डिग्री असून ही अपेक्षित रोजगार मिळत नाही. एकुणच गेल्या काही वर्षात कौशल्य विकासावर फारसं काम झालेलं नाही, हे स्पष्ट होतं. 

कोरोना काळात काम करण्याच्या पद्धती देखील बदलल्या आहेत, या बदललेल्या नव्या पद्धतीना अनुसरून आपल्याला येणाऱ्या काळात कौशल्य कार्यक्रम राबवावे लागतील. १० वी नंतर जवळपास ४०% विद्यार्थी हे शिक्षण सोडून रोजगारासाठी बाहेर पडतात, या विद्यार्थ्यांकडे कौशल्य नसतात ,येणाऱ्या काळात अशा युवकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकतो, त्यासाठी आतापासूनच उपाययोजना करणे आवश्यक आहे. 
नोटबंदी त्यानंतर घाईघाईत लागू केलेला जीसटी तसेच सुस्पष्ट धोरणांचा अभाव यामुळे औद्योगिक क्षेत्र आधीच संकटात सापडले होते, आणि त्यात कोरोनाच्या संकटाने अधिक भर घातली आहे. उत्पादन क्षेत्राची स्थिति सांगणारा रिजर्व बँकेचा Business Assessment Index (#BAI) देखील मोठ्या प्रमाणात खालावला आहे. 

२०२०-२१ आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मागणी प्रचंड घटली असून येणाऱ्या काळात मागणी वाढण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे रोजगार अजून कमी होतील परिणामी लोकांचे उत्पन्न कमी झाल्याने मागणी अजून घटून मंदीची तीव्रता जास्त होईल. मंदीच्या चक्रात सापडलेल्या कंपन्यां विशेषतः #MSME जास्त काळ आर्थिक नुकसान सहन करू शकणार नाहीत. परिणामी या कंपन्या बंद पडून बेरोजगारी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. 

असंघटित क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला असून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. अनेक लोकांनी कर्ज काढून स्वतःचे छोटे मोठे व्यवसाय, तर काही तरुणांनी ऑटो रिक्षा, टॅक्सी यांचा व्यवसाय सुरू केले, परंतु आज ही सर्व लोकं अत्यंत मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहेत .ज्याप्रमाणे मोठ्या कंपन्याचे कर्ज पुनर्गठन करण्यासंदर्भात विचार होत आहेत, त्याप्रमाणे आपल्याला छोट्या व्यावसायिकांचा देखील विचार करणे गरजेचे आहे. 

#NCRB च्या अहवालानुसार गेल्या वर्षी देशात झालेल्या एकूण १.३९ लाख आत्महत्यापैकी बेरोजगारीमुळे १४०१९ आत्महत्या झाल्या असून १०% आत्महत्या या बेरोजगारांच्या असून दिवसाला सरासरी ३८ बेरोजगारांनी आत्महत्या केल्या आहेत. 
एकूणच आज देशातील युवक बेरोजगरीच्या दलदलीत अडकला आहे. या दलदलीतून युवकांना बाहेर काढायचे असल्यास केंद्र सरकारने सार्वजनिक खर्चात वाढ करणे अत्यंत गरजेचे आहे.

 Edited  by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com