...हा तर आमच्यासह पत्रकारांचाही अपमान : मोहन माकडे

एक जिल्हा परिषद सदस्य २० ते ३० गावांचे नेतृत्व करतो. ग्रामीण भागातील लोकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा असतात. त्यांना जिल्हा परिषदेमध्ये कामकाज करताना बसण्यासाठी हक्काचा कक्ष नसणे अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे प्रशासनाने आजच्या घटनेची तत्काळ दखल घेऊन, विरोधी पक्षाच्या सदस्यांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करावा
Mohan Makde
Mohan Makde

नागपूर : समाजकल्याण सभापतींच्या कक्षात विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांच्यासह आम्ही सदस्यांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान सभापती कक्षात आल्या आणि त्यांनी आम्हाला कक्षातून बाहेर जाण्यास सांगितले. आम्हीही वाद न घालता बाहेर निघू लागलो, पण आमच्याही आधी सर्व पत्रकार बंधू बाहेर निघाले. सभापतींनी आमच्यासह लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे शिलेदार पत्रकारांचाही घोर अपमान केला आहे, असे जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे आजच्या प्रकारानंतर म्हणाले. 

श्री माकडे म्हणाले, सभापती माटेंच्या कक्षात कुणीही नव्हते. त्यामुळे आम्ही पत्रकारांना तेथे आमंत्रित केले. पत्रकारांशी आमचा संवाद सुरू झाल्यावर थोड्याच वेळात सभापती माटे तेथे आल्या. आम्हाला बाहेर जायला सांगितले. थोड्या वेळाने पुन्हा आल्या आणि पुन्हा तेच फर्मान सोडले. सभापती आहेत म्हणून काय झाले? जिल्हा परिषद कुणाच्या मालकीची नाही. तेथे त्यांची कुठलीही बैठक सुरू नव्हती. तरीही केवळ विरोधक म्हणून त्यांनी आम्हाला बाहेर काढले. हे करताना पत्रकारांचाही आपण अपमान करत आहोत, याचेही भान त्यांना राहिले नाही. सभापतींनी आमच्यासकट पत्रकारांची माफी मागायला पाहिजे. 

कदाचित घोटाळे काढू म्हणून...
आजच्या पत्रकार परिषदेत आम्ही सत्ताधाऱ्यांचे घोटाळे बाहेर काढणार, असाच काहीसा समज करून कदाचित माणुसकी विसरून सभापती वागल्या असाव्या. असे करत असताना आम्ही त्यांना विचारलेसुद्धा की, येथे तुमची बैठक किंवा आणखी काही कार्यक्रम आहे का, त्यावर नकारार्थी उत्तर मिळाले. त्यामुळे आम्ही केवळ विरोधी पक्षाचे असल्यामुळे त्यांनी हे कृत्य केले. आतापर्यंत विरोधी पक्षाची पत्रकार परिषद समाजकल्याण सभापतींच्या कक्षातच होत आली आहे. या पहिल्या सभापती आहेत की, ज्यांनी विरोधी सदस्यांसह पत्रकारांना अपमानास्पद वागणूक देऊन बाहेर काढल्याचे श्री माकडे म्हणाले.  

हक्काचा कक्ष हवा
एक जिल्हा परिषद सदस्य २० ते ३० गावांचे नेतृत्व करतो. ग्रामीण भागातील लोकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा असतात. त्यांना जिल्हा परिषदेमध्ये कामकाज करताना बसण्यासाठी हक्काचा कक्ष नसणे अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे प्रशासनाने आजच्या घटनेची तत्काळ दखल घेऊन, विरोधी पक्षाच्या सदस्यांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करावा, जेणेकरून भविष्यात कुण्या जिल्हा परिषद सदस्याला आणि पत्रकारांना असे अपमानित व्हावे लागणार नाही, असेही माकडे यांनी सांगितले. 

यापेक्षा ग्रामपंचायत बरी
यापूर्वी मी नागपूर शहरानजीकच्या भिलगाव ग्रामपंचायतीचा १० वर्ष सरपंच राहिलो आहे. ग्रामपंचायतीमध्ये तरी यापेक्षा चांगल्या सुविधा आम्ही निर्माण केल्या. यावेळी पहिल्यांदा सदस्य म्हणून जिल्हा परिषद आलो आणि आजचा प्रकार बघून अतीव दुःख झाले, असे मोहन माकडे म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com