सीमांचलने `धपा धप दिया`, पाच जागा जिंकल्यामुळे इम्तियाज जलील खूश.. - Imtiaz Jalil is happy that Seemanchal has won five seats | Politics Marathi News - Sarkarnama

सीमांचलने `धपा धप दिया`, पाच जागा जिंकल्यामुळे इम्तियाज जलील खूश..

जगदीश पानसरे
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

एमआयएम म्हणजे मुस्लिमांचा पक्ष, जहाल, जातीयवादी अशी आमची प्रतिमा रेखाटण्यात आली होती. त्यामुळे कुठलाही राजकीय पक्ष आमच्या सोबत यायला तयार नव्हता. पण ओवेसींच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत आम्ही औरंगाबादला यश मिळवले. बिहार विधानसभा निवडणुकीत ताकदीने मैदानात उतरलो. आमच्या सभांना लाखोंची गर्दी जमली. काही  ठिकाणी तर नितीश कुमार, राहुल गांधी यांच्यापेक्षा ओवेसींच्या सभेला जास्त लोक जमले होते. त्यामुळे भल्याभल्या पक्षांनी एमआयएमचा धसका घेतला होता.

औरंगाबाद ः  सीमांचलने `धपा धप दिया`. अशा शब्दांत एमआयएमचे खासदार महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. एमआयएमने सीमांचल भागातील २१ मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ एका जागेवर विजय मिळवलेल्या या पक्षाने यावेळी मात्र जोरदार मुंसडी मारत पाच जागा जिंकल्या आहेत. पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील या जोडगळीने दोन आठवडे या भागात जोरदार प्रचार करत पंतगाची प्रचंड हवा निर्माण केली होती. एकवरून पाच आमदार अशी चांगली प्रगती झाल्याबद्दल इम्तियाज जलील यांनी समाधान व्यक्त करत ट्विट केले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी इम्तियाज जलील औरंगाबादहून ओवेसी यांच्या मदतीसाठी गेले होते. १४ दिवसांच्या या दौऱ्यात त्यांनी एकूण ४८ सभा आणि काॅर्नर बैठका घेत मतदारांना केंद्रातील मोदी सरकार, नितीश कुमार, तेजस्वी यादव, काॅंग्रेसचे राहुल गांधी या नेत्यांवर हल्लाबोल केला होता. आतापर्यंतच्या सगळ्याच सत्ताधाऱ्यांनी सीमांचल भागाला विकासापासून कसे वंचित ठेवले हे मतदारांना पटवून सांगितले. त्याचा चांगला परिणाम आज मतमोजणीच्या दिवशी दिसून आला. इम्तियाज जलील यांनी ट्विट करून आपल्या पक्षाने पाच जागा जिंकल्याचे म्हटले आहे.

`सरकारनामा`शी बोलतांना इम्तियाज जलील म्हणाले, सीमांचल भागात एमआयएमने २१ जागांवर उमेदवार दिले होते. या शिवाय बसपा आणि अन्य पक्षाची आमची आघाडी देखील होती. गेल्यावेळी आम्ही एक जागा जिंकलो होतो, आता पाच जागांवर आम्हाला विजय मिळाला आहे. बिहारमध्ये जेव्हा प्रचाराला गेलो तेव्हा पाच वर्षापुर्वी जे चित्र सीमांचल भागात पहायला मिळाले, त्यात काडीचाही बदल झाला नव्हता.

बिहारमध्ये सत्ता कुणाचीही येवो, पण हा भाग कायमच मागास, दुर्लक्षितच राहिला. गरीब, शिक्षणाचा अभाव, शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालये या भागात आभावानेच पहायला मिळतात. हे चित्र बदलायचे असेल तर बदल घडवा, असे आवाहन आम्ही या भागातील जनतेला केले होते. आम्हाला किती यश मिळेल, किती जागा वाढतील याचा विचार न करता आम्ही सीमांचलच्या जनतेला विकासाच्या मुुद्यावर मत मागितली. आज मिळालेले यश पाहता जनतेने आमच्यावर विश्वास टाकल्याचे दिसते.

एमआयएमचा भल्याभल्यांना धसका..

एमआयएम म्हणजे मुस्लिमांचा पक्ष, जहाल, जातीयवादी अशी आमची प्रतिमा रेखाटण्यात आली होती. त्यामुळे कुठलाही राजकीय पक्ष आमच्या सोबत यायला तयार नव्हता. पण ओवेसींच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत आम्ही औरंगाबादला यश मिळवले. बिहार विधानसभा निवडणुकीत ताकदीने मैदानात उतरलो. आमच्या सभांना लाखोंची गर्दी जमली. काही  ठिकाणी तर नितीश कुमार, राहुल गांधी यांच्यापेक्षा ओवेसींच्या सभेला जास्त लोक जमले होते. त्यामुळे भल्याभल्या पक्षांनी एमआयएमचा धसका घेतला होता.

बिहारच्या राजकारणात कधी नव्हे ते बसपा आणि यादवांच्या पक्षाने एमआयएमसोबत आघाडी केली. ज्या सीमांचलकडे निवडणुका झाल्या की कोणताही नेता फिरकत नव्हता, त्या सगळ्या पक्षांनी सीमांचल मध्ये सर्वाधिक सभा घेतल्या, इथल्या विकासाच्या गप्पा केल्या. माझ्यादृष्टीने हे या निवडणुकीच्या निमित्ताने झालेली चांगली गोष्ट आहे. निवडणुका येतील, जातील पण गोर-गरीब आणि मुलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या सीमांचलच्या जनतेला आता तरी चांगले दिवस येतील, असा विश्वासही इम्तियाज यांनी व्यक्त केला.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख