i will try to help folk and backstage artist says amit deshmukh | Sarkarnama

लोककलावंत, पडद्यामागील कलाकारांच्या मदतीसाठी प्रयत्न - अमित देशमुख

सुशांत सांगवे
सोमवार, 11 मे 2020

महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवणाऱ्या वासुदेव, पोतराज यांच्यासह इतर लोककलावंतांना टाळेबंदीमुळे उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. अशीच स्थिती राज्यातील नाटक, चित्रपट आणि मालिका या क्षेत्रांमधील पडद्यामागील कलाकारांवरही ओढावली आहे.

लातूर : महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवणाऱ्या वासुदेव, पोतराज यांच्यासह इतर लोककलावंतांना टाळेबंदीमुळे उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. अशीच स्थिती राज्यातील नाटक, चित्रपट आणि मालिका या क्षेत्रांमधील पडद्यामागील कलाकारांवरही ओढावली आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने अशा कलाकारांना मदत मिळावी, यासाठी प्रस्ताव तयार करून तो राज्य सरकारकडे पाठवला आहे. या कलावंतांना लवकरच मदत मिळण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. पण, त्यामुळे अनेक घटक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सरकारचा आर्थिक गाडा रुतलेला असला तरी शेतकऱ्यांना, कामगारांना सध्या मदत केली जात आहे. त्याप्रमाणे लोककलावंतांना आणि पडद्यामागील कलाकारांनाही मदतीचा हात मिळावा, अशी मागणी सांस्कृतिक क्षेत्रातून जोर धरू लागली आहे. याबाबतची अनेक निवेदने राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून सांस्कृतिक संचालनालयाला मिळाली आहेत. शिवाय, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनीही याबाबतचे धोरण तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, सांस्कृतिक संचालनालयाने मदतीचा प्रस्ताव तयार करून तो राज्य सरकारकडे पाठवला आहे.

संचालनालयाचे संचालक बिभिषण चौरे म्हणाले, सांस्कृतिक मंत्र्यांनी केलेल्या सूचनेनूसार आणि तमाशा मंडळ, दशावतार, संगीतबारी, पडद्यामागील कलाकार अशा अनेक संघटनांनी आमच्याकडे पाठविलेल्या निवेदनानुसार आम्ही हा प्रस्ताव तयार केला आहे. पडद्यामागील कलाकारांबरोबरच वासुदेव, वाघ्या मुरळी, पोतराज, डोंबारी अशा लोककलाकारांना आधार मिळणे सध्या गरजेचे आहे. लोककलेत ४० हून अधिक प्रकार आहेत. ही कला जोपासणारे राज्यातील शेकडो कलाकार टाळेबंदीमुळे आपली कला सादर करुच शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्यासमोर मोठ्या अडचणी उभ्या आहेत. त्यांची दखल आम्ही प्रस्तावाच्या माध्यमातून घेतली आहे.

टाळेबंदीमुळे नाटक, चित्रपट, मालिका या क्षेत्रांतील पडद्यामागील कलाकारांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत. त्यामुळे या परिस्थितीचा अभ्यास करून अशा कलाकारांच्या मदतीसाठी येणाऱ्या काळात काय-काय करता येईल, कोणकोणत्या सवलती देता येतील, याबाबतचे धोरण निश्चितच तयार केले जाईल. तशा सूचना देण्यात आल्या आहेत.
- अमित देशमुख, सांस्कृतिक कार्यमंत्री

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख