Foreign Scholarship: Dhananjay Munde removes condition imposed by BJP government | Sarkarnama

परदेश शिष्यवृत्ती : भाजप सरकारने घातलेली अट धनंजय मुंडेंकडून दूर 

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी "गुड न्युज' दिली आहे. ज्या शाखेतील पदवी त्याच शाखेचे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणार असाल तर परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल' ही भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात घालण्यात आलेली अट मंत्री धनंजय मुंडे यांनी आता दूर केली आहे.

मुंबई : परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी "गुड न्युज' दिली आहे. ज्या शाखेतील पदवी त्याच शाखेचे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणार असाल तर परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल' ही भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात घालण्यात आलेली अट मंत्री धनंजय मुंडे यांनी आता दूर केली आहे. या निर्णयाचा लाखो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. 

आता परदेशी विद्यापीठात विशिष्ट पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतला, त्या विद्यार्थ्यांने आधी घेतलेले पदवी शिक्षण इतर शाखेचे असले तरी त्याला आता परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर या योजनेतील वयोमर्यादेबाबतचा गोंधळही संपविण्यात आला आहे. 

मुळात भारतात सुद्धा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार अनेक अभ्यासक्रमांना आंतरशाखीय प्रवेश दिला जातो. कला, वाणिज्य, विज्ञान आदी शाखेत पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दुसऱ्या विशिष्ट शाखेत प्रवेश दिला जातो. 
ही अट काढून टाकल्यामुळे आता पदवी आणि परदेशात प्रवेश मिळालेली ठराविक पदव्युत्तर शाखा वेगळी असली विद्यार्थी परदेश शिष्यवृत्तीस पात्र असतील. 

ही शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी असलेली वयोमर्यादेसंबंधीचा गोंधळही धनंजय मुंडे यांनी संपविला आहे. मूळ नियमानुसार पदव्युत्तरसाठी 35 वर्षे, तर पीएच.डी.साठी 40 वर्षे अशी वयोमर्यादा आता निश्‍चित करण्यात आली आहे. 

चालू शैक्षणिक वर्षासाठी समाज कल्याण आयुक्तालयामार्फत अर्ज मागविण्यात आले आहेत. येत्या 14 ऑगस्टपर्यंत असलेली त्याची मुदतही वाढविण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री मुंडे यांनी आपल्या विभागाला दिले आहेत. 

कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष येऊन अर्ज दाखल करणे शक्‍य नसल्याने ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे पाठविलेले अर्ज स्वीकारण्यात यावेत, असेही निर्देश मुंडे यांनी आयुक्तालयास दिले आहेत. 

पदवी संदर्भातील अडसर दूर करत कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन नव्याने घेण्यात आलेल्या या निर्णयाचे परदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे. या निर्णयाबद्दल विद्यार्थ्यांनी धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत. 

परदेश शिष्यवृत्तीसंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय 

►ज्या शाखेत पदवी, त्याच शाखेत पदव्युत्तर शिक्षणाची अट 
►भाजप सरकारकडून घालण्यात आलेली ही 
अट धनंजय        मुंडेंकडून दूर  
► वयोमर्यादेसंबंधीचा गोंधळही संपविला 
►अर्ज करण्यास मुदतवाढ 
►ऑनलाईन अर्जही स्वीकारणार 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख