ग्रामपंचायतीचा अर्ज भरला, अन् आजोबांनीच रावसाहेबाला मतदान करू नका सांगितले..

घरात वादविवाद झाला रावसाहेब मात्र निवडणूक लढविण्यावर ठाम होते. गावातल्या पारावर बैठक बसली रावसाहेबांच्या उमेदवारीवर चर्चा झाली.दशरथ बाबांनी गावकऱ्यांना सांगितले की" माझ्या दोन माणसांनाच मतदान करा, रावसाहेब जरी माझा नातू असला तरी त्याला मतदानकरू नका.
The First grampanchyat Election Memoreys news
The First grampanchyat Election Memoreys news

भोकरदन ःकेंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे महाराष्ट्रातील भाजपच्या सध्याच्या वरच्या फळीतील नेत्यामधील एक. त्याचा राजकीय प्रवास देखील ग्रामपंचायत निवडणुकीपासूनच सुरू झाला. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच ते केंद्रात राज्यमंत्री असा त्यांचा चढता आलेख. कशी होती दानवेंची पहिली ग्रामपंचायत निवडणूक, याची रंजक माहिती रावसाहेब दानवे यांनी `सरकारना्मा`शी बोलतांना दिली.

रावसाहेब दानवे हे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्मलेले ;त्यांनी राजकारणात यावे असे त्यांच्या वडिलांना देखील वाटत नव्हते विशेष म्हणजे त्यांनी नोकरी करावी असा त्यांचा अट्टहास होता. १९७७ मध्ये रावसाहेब दानवे यांनी "जनता पार्टी" चे कार्यकर्ते म्हणून राजकारणाला सुरुवात केली. ७८ ला तत्कालीन विधानसभेचे उमेदवार राजकीय गुरु' विठ्ठल अण्णा सपकाळ 'यांचा प्रचार केला. त्यानंतर काही महिन्यातच ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम वाजले.

रावसाहेब दानवे यांचे आजोबा दशरथ बाबा गणपत पाटील दानवे हे पंचक्रोशीतील एक प्रतिष्ठित व वजनदार असे व्यक्तिमत्त्व होते. जवखेडा या त्यांच्या मूळ गावी व आसपासच्या गावांमध्ये बाबांचा शब्द प्रमाण मानला जात होता. दानवे यांनी सुरुवातीला ग्रामपंचायत लढविण्याची इच्छा बोलून दाखवली मात्र त्यांना घरातून वडील, आजोबा इतर सर्वांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला. त्यावेळेस भोकरदन येथील निजामकालीन तहसील इमारतीत निवडणुकीचे कार्यालय होते. 

घरच्यांचा विरोध झुगारून अर्ज भरला..

रावसाहेब दानवे यांनी जालन्याहून येताना शाळेतील चार-पाच मित्र सोबत घेऊन थेट ग्रामपंचायत निवडणुकीचा फॉर्म भरूनच ते गावात परतले. त्यावेळी  वृत्तपत्र, फोन, तसेच गावातून तालुक्याला येण्यासाठी रस्ते देखील धड नव्हते. बसस्टँड देखील १५ किलोमीटरवर होते. फॉर्म भरल्याचे दानवे यांनी  घरात कोणालाही सांगितले नव्हते.  तेव्हा जवखेडा बुद्रुक ,जवखेडा खुर्द व पळासखेडा अशा तीन गावांची मिळून ग्रुप ग्रामपंचायत होती. नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत जवखेडा गावातून दशरथ बाबांनी दोन उमेदवार बिनविरोध द्यायचे ठरवले होते.

एकीकडे रावसाहेबांची ग्रामपंचायत लढवण्याची खटपट सुरू होती. अर्ज छाननीनंतर चिन्ह वाटपाच्या वेळेस रावसाहेबांनी फॉर्म भरला असल्याचे घरी समजले; यानंतर घरात वादविवाद झाला रावसाहेब मात्र निवडणूक लढविण्यावर ठाम होते. गावातल्या पारावर बैठक बसली रावसाहेबांच्या उमेदवारीवर चर्चा झाली. दशरथ बाबांनी  गावकऱ्यांना सांगितले की" माझ्या दोन माणसांनाच मतदान करा, रावसाहेब जरी माझा नातू असला तरी त्याला मतदान करू नका. दुसरीकडे रावसाहेबांनी कसाबसा प्रचार सुरू केला चारशे लोकसंख्या असणाऱ्या गावात २१० मतदान होते.

आजोबांचा नकार, होकारात बदलला..

घरोघरी प्रचारासाठी जात रावसाहेब मतदानासाठी विनवणी करत तेव्हा गावातली मंडळी म्हणत "रावसाहेब तुझ्या आजोबांनी सांगितलं तरच आम्ही तुला मतदान करणार, नाहीतर नाही. यावर अहो, माझे आजोबा नातवाला मतदान करा असं कशाला म्हणतील? असे सांगत दानवेंनी गावकऱ्यांना संभ्रमात टाकले. आजोबा-नातवाच्या भांडणात गावकरी मात्र कात्रीत सापडले होते.

पुन्हा पारावर बैठक बसली, गावकऱ्यांनी दशरथ बाबांना समजावले की, `जर तुमचा नातू पराभूत झाला, तर आसपासच्या पंचक्रोशीत तुमच्याबद्दल चांगला संदेश जाणार नाही. शिवाय तुमच्या प्रतिष्ठेला देखील धक्का पोहोचेल`,मग दशरथ बाबांनाही ते पटले. अखेर रावसाहेबांना मतदान करण्याचे ठरले. मात्र निवडून देण्याआधीच रावसाहेबांनी निवडून आल्यावर लगेच राजीनामा देण्याची अट आजोबांनी घातली.अखेर यशवंतराव बापू पुंगळे या प्रतिस्पर्धी उमेदवाराने रावसाहेबांना मतदान करा म्हणत त्यांचाच प्रचार केला. मतमोजणीला भोकरदनला सायकलवर यावे लागायचे. रस्ता देखील धड नव्हता.

आधी रस्ता नव्हता, आता थेट राष्ट्रीय महामार्ग..

निवडून आल्यानंतर पेढे नव्हते म्हणून गुळ वाटून  आनंद व्यक्त केला. साधारण दीड वर्ष सरपंच राहिल्यानंतर रावसाहेब पुढे सभापती झाले मात्र आजही ती निवडणूक त्यांना संस्मरणीय वाटते. गावात येण्यासाठी धड रस्ता देखील नव्हता  ही सल त्यांच्या मनात तीस वर्ष होती  आज त्या गावात रावसाहेबांनी चक्क नॅशनल हायवे मंजूर करून आणला शिवाय तीनच वर्षात काम पूर्ण देखील केले. सरपंचाने जर मनात ठरवलं तर तो गावाच्या विकासासाठी काहीही करू शकतो त्यासाठी कुठलेही आमदार-खासदार मंत्र्यांची गरज नाही, असेही रावसाहेब दानवे म्हणाले. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com