Farmers to write five lack letter to Cm over Milk Price informs Sadabhau Khot
Farmers to write five lack letter to Cm over Milk Price informs Sadabhau Khot

दूध दरासाठी शेतकरी मुख्यमंत्र्यांना ५ लाख पत्रे पाठवणार : सदाभाऊ खोत यांची माहिती

केंद्र सरकारने दूध भुकटी आयात केल्याची खोटी माहिती सांगून काहीजण गैरसमज पसरवत आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी असे सांगावे, हे धक्कादायक आहे. त्यांनी माहिती घेऊन बोलावे. अशी बनवाबनवी करून आजचे मरण उद्यावर ढकलता येईल. प्रश्‍न सुटणार नाही, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे

सांगली : गायीच्या दुधाला दहा रुपये प्रतिलिटर अनुदान द्यावे, ३० रुपये लिटरने सरकारने दूध खरेदी करावी, दूध भुकटी निर्यातीला प्रतिकिलो पन्नास रुपये अनुदान द्यावे, अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकरी मुख्यमंत्र्यांना पाच लाख पत्रे पाठवणार आहेत. गुरुवार (ता. १३) पासून १८ तारखेपर्यंत हे आंदोलन चालणार आहे, अशी माहिती आमदार सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आमदार चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत, महादेव जानकर, विनायक मेटे, अविनाश महातेकर यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या आंदोलनाचे नियोजन केले. त्याची माहिती खोत यांनी दिली. ते म्हणाले, "दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी महायुतीचे तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन गुरुवारपासून सुरू होत आहे. शेतकरी शेतातून, गोठ्यातून मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करतील. दुधाचा दर १८ रुपयांपर्यंत खाली आला आहे. या स्थितीत राज्य सरकारने केंद्राकडे बोट दाखवून हात वर करून चालणार नाही. दूध भुकटी निर्यातीला ५० रुपये अनुदान द्यायला हवे."

खोत पुढे म्हणाले, "राज्य सरकारने ३० रुपये लिटरने दूध खरेदी करावी किंवा दुधाला १० रुपये प्रतिलिटर अनुदान द्यावे. कर्नाटकात दुधाचा दर ३२ रुपये आहे. तेथे ६ रुपये अनुदान दिले जाते. राज्यात अतिरिक्त ६५ लाख लिटर दूध आहे. त्याची भुकटी करावी लागते. जागतिक दर कोसळल्याने ५० हजार टन भुकटी पडून आहे. राज्य सरकार अमृत आहार योजनेतून वर्षाला पाच हजार टन भुकटी बालके, गरोदर मातांना मोफत देणार आहे. या हिशेबाने भुकटी संपायला दहा वर्षे लागतील. त्यामुळे सरकार गंभीर नाही, असेच म्हणावे लागते.''

"केंद्र सरकारने दूध भुकटी आयात केल्याची खोटी माहिती सांगून काहीजण गैरसमज पसरवत आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी असे सांगावे, हे धक्कादायक आहे. त्यांनी माहिती घेऊन बोलावे. अशी बनवाबनवी करून आजचे मरण उद्यावर ढकलता येईल. प्रश्‍न सुटणार नाही. केंद्राने जानेवारीतील अहवालाच्या आधारे दूध भुकटी आयातीचे धोरण राबवले होते. त्याचे नोटिफिकेशन निघाले; मात्र आयात केलेली नाही.'' असेही सदाभाऊ खोत म्हणाले. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com