आशिष शेलारांनी औकातीत रहावं, माझ्या नादाला लागाल तर पळता भूई थोडी करीन.. - Ex Minister Jaisingrao Gaikwad Warn bjp leader Asish Shelar | Politics Marathi News - Sarkarnama

आशिष शेलारांनी औकातीत रहावं, माझ्या नादाला लागाल तर पळता भूई थोडी करीन..

जगदीश पानसरे
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

शेलार भाजपमध्ये कसे आले, काय देऊन आले हे सांगण्याची माझ्यावर वेळ आणू नका. उद्या एखादे कंत्राट मिळाले नाही तर तुम्ही पक्षात राहाल की नाही? ही देखील शंका आहे. तेव्हा माझ्यावर टिका करण्याआधी आपली औकात काय आहे ते तपासा, मगच नादाला लागा. मी खूप संयम बाळगला आहे, यापुढेही बाळगणार आहे.

औरंगाबाद ः माझी उंची पाच फुट दोन इंच  एवढीच आहे, पण ती विचारणाऱ्या आशिष शेलार यांची औकात काय आहे? माझ्यावर टिका करण्याआधी आपण पक्षासाठी काय केले, कधी रस्त्यावर, जेलमध्ये गेलो होतो का? पोलीसांच्या लाठ्या खाल्ल्या का? याचा विचार करा, उगाच माझ्या नादाला लागू नका, मी बोलायला लागलो तर तुम्हाला पळता भूई थोडी होईल,  असा गर्भीत इशारा माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी शेलार यांना दिला आहे.

मराठवाडा पदवीधरचे भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारानिमि्त्त आयोजित बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आशिष शेलार गुरुवारी औरंगाबादेत आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी नुकताच भाजपचा राजीनामा देऊन बाहेर पडलेल्या जयसिंगराव गायकवाड यांच्यावर टिका केली होती. पक्षाची उंची तपासण्याआधी जयसिंगरावांनी स्वतःची उची तपासावी, असा टोला शेलार यांनी लगावला होता.

गायकवाड यांनी आज शेलार यांच्या टिकेला उत्तर देतांना औकातीत राहा असा निर्वाणीचा इशारा दिला. `सरकारनामा`शी बोलतांना जयसिंगराव म्हणाले, माझी उंची पाच फुट दोन इंच आहे, ती मला माहित आहे, ती कुणी विचारण्याची आणि सांगण्याची गरज नाही. पण टिका करणाऱ्या शेलारांची राजकीय उंची किती आहे हे त्यांनी एकदा तपासावे. पक्षासाठी आंदोलन केली, पोलीसांच्या लाठ्याकाठ्या खाल्ल्या, आणीबाणीच्या काळात दीड वर्ष जेलमध्ये राहिलो. माझी उंची विचारणारे कधी पक्षाच्या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते का? की कधी पोलीसांचा मार खाल्ला, जेलमध्ये, न्यायालयीन कोठडीत हे गेले.

अशा व्यक्तीने माझ्यावर टिका करणे म्हणजे `दोन दिवसात कोल्हा उसात`, असाच प्रकार म्हणावा लागेल. तेव्हा माझ्यावर टिका करण्याआधी आपली औकात काय आहे ते तपासा, मगच नादाला लागा. मी खूप संयम बाळगला आहे, यापुढेही बाळगणार आहे. पण कुणीही यावं आणि माझ्यावर टिका करावी, एवढा मी लेचापेचा नाही. मी बोलायला लागलो तर तुम्हाला पळता भूई थोडी करीन, असा गर्भीत इशाराही जयसिंगराव गायकवाड यांनी शेलार यांना दिला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख