एकनाथ खडसे म्हणतात माझ्यासोबत 15 त 16 आमदार; पण `माजी` - eknath khadse claims 15 ex mlas are with me | Politics Marathi News - Sarkarnama

एकनाथ खडसे म्हणतात माझ्यासोबत 15 त 16 आमदार; पण `माजी`

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

आजी आमदारांना पक्षांतरबंदी कायद्यामुळे भाजप सोडण्यात अडचण असल्याचे खडसेंचे स्पष्टीकरण 

जळगाव  : माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत मी अमित शहा, जे.पी. नड्डा यांना भेटू कैफियत मांडली होती. परंतु, माझ्याबद्दल वरिष्ठांकडे चुकीच्या माहितीची पेरणी झाल्याने न्याय मिळू शकला नाही, असे सांगत माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले, फडणवीसांच्या सांगण्यानुसार मी अर्धसत्य बोलत असेल तर त्यांनी नेमके काय घडले, हे त्यांनीच सांगावे, असे आव्हानही दिले.

भाजपच्या सदस्यत्वाचा त्याग करताना खडसेंनी फडणवीसांमुळे ही वेळ आल्याचे जाहीर केले. त्यावर फडणवीस यांनी खडसे अर्थसत्य सांगत असून आपण योग्यवेळी बोलू, अशी प्रतिक्रिया दिली. त्याबाबत खडसे आज माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, माझ्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, व्ही. सतीश आदी नेत्यांना भेटलो. पण फडणवीसांच्या हाती राज्याची सूत्रे असल्याने त्यांनी माझ्याबाबतीत चुकीची माहिती वरिष्ठांकडे सादर केली होती. त्यामुळेच मला न्याय मिळू शकला नाही.

.. तर त्यांनी सत्य सांगावे!
फडणवीस आता म्हणत आहेत की, या प्रकरणात एकच बाजू मांडली, योग्यवेळी बोलेल. पण, मी गेल्या साडेचार वर्षांपासून सातत्याने याबाबत बोलतोय. माझा गुन्हा काय, काय दोष आहे, याचा जाब विचारतोय. परंतु, त्यावेळी फडणवीस काहीही बोलले नाही. त्यांना सत्य मांडायचे असेल आणि त्यांच्याकडे असेल तर ते त्यांनी सांगावेच, असे आव्हानही खडसेंनी दिले.

माजी आमदार सोबत, विद्यमान नंतर..
पक्षाकडून न्याय मिळाला नाही, म्हणून समर्थकांशी बोलून आपण पक्षांतर केले. माझ्यासोबत आणखी १५-१६ माजी आमदार आहेत, ते शुक्रवारी (ता.२३) मुंबईत येतील. विद्यमान आमदारांना पक्षांतर बंदीच्या कायद्यामुळे अडचण आहे. परंतु, नंतर तेदेखील टप्प्याटप्प्याने सोबत येतील, असेही खडसे म्हणाले.

खडसे हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना
शुक्रवारी (ता.२३) राष्ट्रवादीत प्रवेश निश्‍चित झाल्यानंतर खडसे आज सपरिवार मुंबईला गेले. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मुक्ताई साखर कारखान्याच्या हेलिपॅडवर आलेल्या हेलिकॉप्टरने खडसे मुंबईकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत पत्नी तथा दूध संघाच्या चेअरमन मंदाताई खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे- खेवलकर, खडसेंचे केअर टेकर गोपाळ पाटील आदी उपस्थित होते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख