Don't hate your own brothers from Mumbai says MLA Shivendraraje Bhosale | Sarkarnama

मुंबईवाले आपलेच बांधव, त्यांचा तिरस्कार करू नका : शिवेंद्रसिंहराजे 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 1 जून 2020

सातारा तालुक्‍यातील परळी खोऱ्यात नऊ गावांतून 21 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. ही गावे कंटेन्मेंट झोनमध्ये गेल्याने गावातील शेतकरी हवालदिल झाले होते.

सातारा : मुंबईवाले हे आपलेच बांधव आहेत. त्यांचा तिरस्कार करु नका. योग्य खबरदारी घेतली तर कोरोनाचे संकट लवकरच दुर होईल. परळी व ठोसेघर परिसरातील ग्रामस्थांनो विचलीत होऊ नका. कोरोनाचे संकट असेच सुरु राहिले तरी शेती पडून द्यायची नाही. आपली काळजी स्वत:च घेत कुटुंब सावरायचे आहे, असा सबुरीचा आणि आत्मियतेचा सल्ला देत परळी खोऱ्यातील ग्रामस्थांचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मनोबल वाढविले. 

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी परळी, ठोसेघर येथील कंटोन्मेंट झोनमधील गावांची पाहणी केली. तसेच येथील शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजु भोसले, गटविकास अधिकारी संजय धुमाळ, तालुका वैद्यकिय अधिकारी डि.जी. पवार, विस्ताराधिकारी शंतनु राक्षे, परळीचे वैद्यकिय अधिकारी सचिन यादव, ठोसेघरचे वैद्यकिय अधिकारी मानसी पाटील, कृषी अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते. 

कोरोनामुळे सर्वजण तणावाखाली आहेत. परळी ठोसेघर भागात शेतीचा हंगाम उंबरठ्यावर येऊन थांबला आहे. या संकटामुळे शेतकऱ्यांची द्वीधा मनस्थिती झाली आहे. मात्र असे विचलीत होऊ नका. कोरोनाचे संकट असेच सुरु राहिले तरी शेतीही पडू द्यायची नाही. आपली काळजी स्वत:च घेत कुटूंब सावरायचे आहे. या परिसरातील वाडयावस्त्या तसेच गावात खते बि-बियाणे उपलब्ध करुन देण्याच्या सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. 

सातारा तालुक्‍यातील परळी खोऱ्यात नऊ गावांतून 21 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. ही गावे कंटेन्मेंट झोनमध्ये गेल्याने गावातील शेतकरी हवालदिल झाले होते. जर गावात शेतीसाठी बि-बियाणे, खते कशी उपलब्ध करायची पिकांची औषध फवारणी या समस्या शेतकऱ्यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्यासमोर मांडल्या. या सर्व अडीअडचणी ऐकल्यावर त्यांनी तात्काळ उपस्थित अधिकाऱ्यांना सुचना करत परळी, ठोसेघर परिसरातील वाड्यावस्त्या तसेच गावात खते बि-बियाणे उपलब्ध करुन देण्याच्या सुचना केल्या. 

शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी भासू नयेत. काही अडचणी असल्यास माझ्याशी संपर्क करा, असे सांगून त्यांनी कोरोनाबाधित झोनमधील गावांची माहिती घेतली. जी कुटुंबे शाळेत मंदिरात मुक्कामी आहेत. त्यांना सर्व सोयीसुविधा पुरवाव्यात. मुंबईवाले हे आपलेच बांधव आहेत. त्यांचा तिरस्कार करु नका. योग्य खबरदारी घेतली तर हे संकट लवकरच दुर होईल, अशी अपेक्षा व्यक्‍त करत शिवेंद्रसिंहराजे यांनी ग्रामस्थांचे मनोबल वाढविले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख