विधान परिषदेसाठी डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील यांचे नाव चर्चेत

साहित्य, कला, क्रिडा, समाजसेवा आदी क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या व या क्षेत्रात आपले योगदान देणाऱ्या व्यक्तांना राज्यपालांकडून विधान परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्त केले जाते. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ रिक्त जागांवरती निवड केली जाणार आहे. राज्यात विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या आणि महाविकास आघाडीशी संबंधीत असलेल्या उमेदवारांचा तिन्ही पक्षाकडून सध्या शोध सुरु आहे.
Dhavalsinh Mohite Patil
Dhavalsinh Mohite Patil

पंढरपूर : राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य निवडीची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. राज्यात स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या  महाविकास आघाडीकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी देखील  सुरु झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष आणि माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

साहित्य, कला, क्रिडा, समाजसेवा आदी क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या व या क्षेत्रात आपले योगदान देणाऱ्या  व्यक्तांना  राज्यपालांकडून विधान परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्त केले जाते. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ रिक्त जागांवरती निवड केली जाणार आहे. राज्यात  विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या आणि महाविकास आघाडीशी संबंधीत असलेल्या उमेदवारांचा तिन्ही पक्षाकडून सध्या शोध सुरु आहे. 

डाॅ.धवलसिंहांना विधानपरिषदेवर संधी देवून एका दगडात अनेक पक्षी मारण्यासाठी राष्ट्रवादीकडून तसे प्रयत्न सुरु आहेत. मोहिते पाटलांना संधी दिली तर सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला आणखी बळ मिळेल, असा आशावाद ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बळावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षाबरोबर सोबत असलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते व त्यांचे पुत्र आमदार रणजितसिंह  यांनी ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपात प्रवेश केला. तेव्हा पासून जिल्ह्यात राष्ट्रवादीकडे पक्ष नेतृत्वाची उणीव आहे. लोकसभे पाठोपाठ विधानसभेला ही राष्ट्रवादीला  माळशिरस तालुक्यात फटका बसला.

पक्ष वाढीसाठी प्रयत्न

विधानसभेनंतर सावध झालेल्या राष्ट्रवादीने आता  पक्ष वाढीसाठी  पावले टाकण्यास सुरवात केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. सत्तेच्या जोरावर राज्यात व विशेषतः सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी अधिक भक्कम करण्यासाठी पक्षनेतृत्वाने तसे जोरदार प्रयत्न सुरु केलेआहेत. पक्षाला अधिक उभारी देणाऱ्या आणि पक्ष संघटन वाढीसाठी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्याच्या दृष्टीने तसे  प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये अकलूज येथील डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे नाव सध्या आघाडीवर आहे.

युवा चेहेरा देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न

सध्या डाॅ.धवलसिंह हे विजयसिंह व रणजितसिंह यांच्यापासून दूर आहेत. विधानसभा निवडणूकीत डाॅ. धवलसिहांनी राष्ट्रवादीला मदत केली होती. त्यानंतर आता धवलसिंहांच्या रुपयाने जिल्ह्यात युवा  चेहरा देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून  सुरु असल्याची खात्रीशीर माहिती आहे. डाॅ.धवलसिंहांना राष्ट्रवादीने राज्यपाल नियुक्त कोठ्यातून आमदारकी दिली तर  जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांबरोबरच माजी मंत्री (कै.) प्रतापसिंह मोहिते पाटील यांना मानणारे अनेक जुने जाणते  कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादीत सक्रीय होतील, अशी आशाही राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. 

भाजपात गेलेले माजी मंत्री विजयसिंह व आमदार रणजितसिहांना राजकीय शह देण्यासाठी मोहिते पाटील घराण्यातीलच डाॅ. धवलसिंहांना राष्ट्रवादीकडून आमदारकीचे बक्षीस दिले जाईल अशी शक्यता राजकीय जाणकारांमधून  वर्तवली जात आहे. याबाबत डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील यांना विचारले असता, ''राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आपण काम करत आहोत. विधानसभा निवडणुकीत पक्षाला मदत केली आहे. कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून राज्यभरात काम सुरु केले आहे. क्रिडा क्षेत्राबरोबरच कृषीक्षेत्रात देखील माझे काम सुरु आहे.  आमचे नेते शरद पवार माझा नक्की विचार करतील, त्यांनी संधी दिली तर आपण आणखी जोमाने पक्षवाढीसाठी  काम करु,'' असे त्यांनी सांगितले. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com