पोटदुखीच्या त्रासामुळे धनंजय मुंडे लिलावतीत दाखल.. - Dhananjay Munde enters auction due to stomach. | Politics Marathi News - Sarkarnama

पोटदुखीच्या त्रासामुळे धनंजय मुंडे लिलावतीत दाखल..

दत्ता देशमुख
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

धनंजय मुंडे यांना काही महिन्यांपूर्वी कोरोना विषाणूची बाधा झाली होती. त्यावर त्यांनी यशस्वी मात केली होती. आता पोटदुखी बळावल्याने लिलावतीचे प्रमुख डॉ. मेहुल चोक्सी यांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
 

बीड : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांना उपचारासाठी मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागच्या दहा दिवसांपासून त्यांना पोटदुखीचा त्रास सुरु होता. मात्र, त्यांनी आजार अंगावर काढला. अखेर मंगळवारी दुपारी मुंडे लिलावतीत दाखल झाले.धनंजय मुंडे यांनी याबाबत स्वत:च्या ट्विटल हँडलवरुन माहिती दिली आहे. प्रकृती स्थिर असून लवकरच सेवेत दाखल हेाईल, असेही मुंडे यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांना मागच्या दहा दिवसांपासून पोटदुखीचा कमी - अधिक त्रास सुरु होता. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी औषधोपचार घेतलाही, मात्र, मंत्री म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासह सध्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर निराधारांच्या अनुदानाचे प्रश्न मार्गी लावणे, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या या कारणांमुळे रुग्णालयात दाखल होणे त्यांनी टाळले. मात्र, मंगळवारी त्रास अधिकच जाणवू लागल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांना रुग्णालयात भरती होण्याचा आग्रह केला.

धनंजय मुंडे मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल झाले असून रुग्णालयाचे प्रमुख डॉ. मेहुल चोक्सी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रक्तासह त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या आहेत. गरजेनुसार सर्वच चाचण्या करण्यात येणार असल्याचे निकटवर्तीयांनी सांगीतले. पोटाच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

दरम्यान, जुन महिन्यात धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यावरही यशस्वी मात करत धनंजय मुंडे पुन्हा लोकसेवेत दाखल झाले होते.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख