फडणवीस राणा पाटलांच्या येता घरी....

देवेंद्र फडणवीस हे रात्री पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने उस्मानाबादेत दाखल झाले. सर्किट हाऊसमध्ये थांबल्यानंतर राणा पाटलांनी त्यांना आपल्या एमआयडीसी येथील बंगल्यावर मुक्कामासाठी नेले. फडणवीस, राणा पाटील, सुरेश धस हे तिघेही एकाच गाडीतून रात्री बंगल्यावर पोहचले.
Devendra fadanvis halt rana patils house news
Devendra fadanvis halt rana patils house news

उस्मानाबाद ः  दिल्या घरी सुखी रहा, असा सल्ला देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आपल्या तुळजापुर दौऱ्यात भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या घरवापसीला स्पष्ट शब्दात नकार दिला होता. त्यानंतर अवघ्या काही तासांतच माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आपल्या निवासस्थानी मुक्कामी बोलवत राणा पाटील यांनी देखील उत्तर दिले. फडणवीस आज उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीनेग्रस्त गावांना भेट देऊन तेथील नुकसानाची पाहणी करत आहेत.

राज्यात विशेषतः मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी या निमित्ताने पाहणी दौरा करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्या आमदार राणा पाटील यांच्या तुळजापूरातूनच त्यांनी या दौऱ्याला सुरूवात केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पक्ष सोडून गेलेल्या पैकी अनेकजण पुन्हा घरवापसी करू इच्छित आहेत, या प्रश्नाला उत्तर देतांना देखील पवारांनी उस्मनाबाद मधील नेत्यांना पक्षात घेणार नाही, त्यांनी आहे तिथे सुखी रहावे, असा टोला लगावत राणा पाटील यांच्या परतीचे दोर कापल्याचे स्पष्ट संकेत दिले होते.

शरद पवारांच्या या विधाननंतर राज्यभरात चर्चा सुरू असतांनाच देवेंद्र फडणवीस हे रात्री पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने उस्मानाबादेत दाखल झाले. सर्किट हाऊसमध्ये थांबल्यानंतर राणा पाटलांनी त्यांना आपल्या एमआयडीसी येथील बंगल्यावर मुक्कामासाठी नेले. फडणवीस, राणा पाटील, सुरेश धस हे तिघेही एकाच गाडीतून रात्री बंगल्यावर पोहचले.

शरद पवार यांनी केलेल्या विधानावर काहीही प्रतिक्रिया न देणाऱ्या राणा पाटलांनी संधी मिळताच  फडणवीसांना आपल्या बंगल्यावर मुक्कामी नेत त्यांचे स्वागत केले. यातून अप्रत्यक्षरिता राणा पाटलांनी पवारांच्या विधानाला उत्तरच दिल्याचे बोलले जाते.तर फडणवीसांनी देखील राणा पाटलांच्या घरी मुक्कामाला जात पाटील हे आमच्याकडे सुखीच आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न यातून केल्याचे दिसते.

एकंदरित उस्मनाबाद जिल्ह्यात काल शरद पवार यांनी केेलेले विधान आणि त्यानंतर फडणवीसांनी राणा पाटलांच्या घरी मुक्काम करत त्यांना दिलेले महत्व यांची जोरदार चर्चा सुरु आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यातील दोन महत्वाच्या नेत्यांच्या या दौऱ्यात देखील कुरघोडीचे राजकारण झाल्याचे यावरून दिसून आले.

Edited By : Jagdish pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com