काॅग्रेसच्या मंत्र्यांना फक्त निधीच नाही, तर सरकारमध्ये इज्जतही नाही.. - Congress accounts are not only funded, they are not respected in the government | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

काॅग्रेसच्या मंत्र्यांना फक्त निधीच नाही, तर सरकारमध्ये इज्जतही नाही..

जगदीश पानसरे
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

भाजपने जयसिंगरावांना सगळं काही दिलं, आता पक्षात नव्या नेतृत्वाला संधी देण्याचे धोरण असल्याने आपण ते स्वीकारले पाहिजे, त्या शिवाय नवे नेतृत्व निर्माण होणार नाही. त्यामुळे जयसिंगराव गायकवाडांनी भाजपवर टिका करतांना आधी आपली उंची तपासावी आणि मगच भाजपच्या उंचीवर बोलावे.

औरंगाबाद ः महाविकास आघाडी सरकारमधील महत्वाचे काॅंग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमच्याकडे असलेल्या खात्यांना निधी मिळत नाही, अशी नाराजी व्यक्त केली आहे. पण त्यांच्या या मताशी मी सहमत नाही, कारण त्यांच्या खात्यांना केवळ निधीच मिळत नाही असे नाही, तर काॅंग्रेसला व त्यांच्या मंत्र्यांना सरकारमध्ये इज्जत देखील नाही, अशी टिका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

मराठवाडा पदवीधरचे भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या निवडणुक प्रचाराचा आढावा घेण्यासाठी शेलार आज शहरात आले होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर टिका करतांनाच वीज बीलाचे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे सांगितले.

आशिष शेलार म्हणाले, फडणवीस सरकारच्या काळात ज्या जनतेच्या हिताच्या महत्वाकांक्षी योजनांना आम्ही बळ दिले होते, त्या सगळ्या योजना बासनात गुंडाळून ठेवण्याचे काम महाविकास आघाडी्च्या ठाकरे सरकारने केले आहे. मराठवाड्यासाठी अत्यंत महत्वाची असलेली मराठवाडा वाॅटरग्रीड योजना हे त्याचे उदाहरण आहे. औरंगाबाद शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी मिटवण्यासाठी फडणवीस सरकारने १६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजुर केली होती.

शहरातील कचऱ्यांचा प्रश्न गंभीर झाला तेव्हा कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यासाठी आमच्या सरकारने ९० कोटी रुपये दिले. या शिवाय शहरातील रस्त्यांसाठी १२५ कोटी रुपयांचा निधी दिला. पण अजूनही ही कामे रखडलेली आहेत. येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जनतेला द्यावी लागतील.

जयसिंगरावांनी त्यांची उंची पाहून बोलावे...

भाजप हा पक्ष २५ फुट उंचावरून बोलतो अशी टिका भाजपतून बाहरे गेलेले ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी केली होती. त्याला उत्तर देतांना शेलार म्हणाले, भाजपने जयसिंगरावांना सगळं काही दिलं, आता पक्षात नव्या नेतृत्वाला संधी देण्याचे धोरण असल्याने आपण ते स्वीकारले पाहिजे, त्या शिवाय नवे नेतृत्व निर्माण होणार नाही. त्यामुळे जयसिंगराव गायकवाडांनी भाजपवर टिका करतांना आधी आपली उंची तपासावी आणि मगच भाजपच्या उंचीवर बोलावे.

पक्षातील ज्येष्ठ नेते म्हणून आम्ही तुमचा आदर करतो, पण तुम्ही देखील गेली अनेक वर्ष ज्या पक्षात राहिलात, खासदार, आमदारकी आणि मंत्रीपद भोगली त्या पक्षावर टिका करतांना संयम दाखवला पाहिजे. अन्यथा यापुढे जशास तसे उत्तर आमच्याकडून दिले जाईल. जे बोराळकर तुमच्या निवडणुकीच्या वेळी प्रचार प्रमुख होते, त्यांना पक्षाने उमेदवारी दिल्यावर त्यांच्या विरोधात भूमिका घेणे योग्य नसल्याचेही शेलार म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख