कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी नगर जिल्हा प्रशासनाचे हे प्रयत्न सुरू

ग्रामस्तरीय अधिकारी, पोलीस पाटील यांच्या मार्फत ही माहिती तातडीने तालुकास्तरीय यंत्रणांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
Dr. rajendra bhosale.jpg
Dr. rajendra bhosale.jpg

नगर : जिल्ह्यात निर्बंध शिथिल झाल्यानंतर काही भागात लग्न समारंभ अथवा इतर सोहळ्यांसाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. तसेच प्रतिबंधात्मक नियम आणि कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन त्यांच्याकडून होताना दिसत नाही. त्यामुळे तालुकास्तरीय यंत्रणांनी याबाबत अधिक दक्ष राहून कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांनी दिल्या. (The city district administration continues its efforts to prevent the third wave of corona)

ग्रामस्तरीय अधिकारी, पोलीस पाटील यांच्या मार्फत ही माहिती तातडीने तालुकास्तरीय यंत्रणांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. तसेच हिवरे पॅटर्ननुसार गावामध्ये कार्यरत पथकांनी अधिक कार्यतत्पर होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून कोरोना उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, पल्लवी निर्मळ, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके हे जिल्हा मुख्यालय तर उपविभाग, तालुकास्तरावरील महसूल, पोलीस, ग्रामविकास, आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. 

डाॅ. भोसले म्हणाले, की सध्या जरी रुग्णसंख्येत काहीशी घट दिसून येत असली, तरी संसर्गाचा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करावे. तालुकास्तरीय यंत्रणांनीही या नियमांचे पालन करीत नसलेल्या व्यक्ती आणि आस्थापनांवर कारवाई करावी.

मोठ्या प्रमाणात गर्दी जमवणारे कोणतेही कार्यक्रम, लग्न समारंभ, सोहळे शक्यतो टाळावेत अथवा कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करुनच करावेत, असे आवाहनही त्यांनी जिल्हावासियांना केले आहे.

अनेक गावात तसेच नगरपंचायत आणि नगरपरिषद क्षेत्रात संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था तसेच त्या-त्या भागातील व्यापारी, उद्योजक, आस्थापना यांचे प्रमुख यांनी स्वताहून पुढाकार घेऊन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. काही ठिकाणी या आस्थापना स्वताहून लवकर बंद केल्या जात आहेत, तसेच आठवड्याच्या शेवटी शनिवारी अथवा रविवारी त्यांनी त्यांच्या क्षेत्रात जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांचे  निश्चित कौतुक असून, नागरिकांनीही त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.    

कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी सर्वच घटकांचा सहभाग महत्वाचा आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याबाबत तालुका यंत्रणांनी काळजी घ्यावी. त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकांनी अशा गर्दी होणाऱ्या ठिकाणी कारवाईच्या सूचना त्यांनी दिल्या. केवळ कारवाई हे प्रशासनाचे उद्दिष्ट नसून संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना आवश्यक आहेत, त्या केल्या जातील. नागरिकांनीही याबाबत अधिक दक्ष राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चाचण्यांचे प्रमाण चांगले राहिले आहे. त्यामुळे आपण संशयित रुग्णांना शोधून संसर्ग साखळी तोडण्याचे महत्वपूर्ण काम करत आहोत. नागरिकांनीही आजाराची लक्षणे जाणवल्यास तत्काळ जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होऊन उपचार घ्यावेत. यापैकी कोणी बाधित आढळल्यास त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची नावे आरोग्य यंत्रणेला दिल्यास तात्काळ त्यांच्या चाचण्या करुन कोरोना संसर्ग साखळी तोडण्यास निश्चितपणे मदत होईल. जिल्ह्यात आता दैनंदिन व्यवहार सुरु कऱण्यास परवानगी दिली असली तरी गर्दी वाढून पुन्हा कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. 

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com