मांजराप्रमाणे दूध पिणारे संजय राऊत कशात अडकलेत, हे चंद्रकांतदादांनी सांगितले... - chandrakant patil targets Sanjay Raut on woman complaint | Politics Marathi News - Sarkarnama

मांजराप्रमाणे दूध पिणारे संजय राऊत कशात अडकलेत, हे चंद्रकांतदादांनी सांगितले...

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 24 एप्रिल 2021

भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना जोरदार रंगला आहे... 

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरूझाली असून आता चंद्रकांतदादांनी संजय राऊतांवर एक महिलेने केलेल्या आरोपाचा उल्लेख केला आहे. या महिलेने केलेल्या आरोपांची चौकशी केंद्रीय महिला चौकशी करावी, अशी मागणी करत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल चढविला आहे. एवढेच नाही तर संजय राऊत यांची रोज उठून नाटकं चाललीत, असा वार केला. मांजर डोळे मिटून दूध पिते म्हणजे कोणीही तिला बघत नाही, असं तिला वाटतं. हाच प्रकार संजय राऊत यांना लागू पडतो, अशी उपमा त्यांनी दिली.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडले. राऊत यांनी रोज उठून आम्हाला भाषण, प्रवचन देऊ नये. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले तर संजय राऊत लगेच टीका करतात. हेच उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्याबाबतीत केले तर आम्ही प्रयत्न करत असल्याचे ते सांगतात. मग केंद्र सरकार काय झोपा काढतंय का? हा दुटप्पीपणा चालणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी छापे टाकल्यानंतर भाजपने महाविकास आघाडीवरील हल्ला आणखी जोरदार केला आहे. निलंबित पोलिस निरीक्षक सचिन वाझे याने अनिल परबांवर थेट न्यायालयात आरोप केल्याने भाजपच्या हाती आयता मुद्दा सापडला आहे.

अनिल परब यांचीही चौकशी झाली पाहिजे.  त्यांच्यावरही अनिल देशमुखांइतकाच गंभीर आरोप आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ऑन पेपर त्यांच्यावर हा आरोप केला आहे. याशिवाय, संजय घोडावत यांचीही केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी झाली पाहिजे. सचिन वाझेच्या पत्रात संजय घोडावत आणि अजित पवार यांचा उल्लेख आहे. मला थेट अजित पवार यांचं नाव घ्यायचं नाही. मी केवळ अनिल परब आणि संजय घोडावत यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, एवढंच म्हणत आहे. काहीजण सुपात आहेत तर काहीजण जात्यात असल्याकडे चंद्रकांत पाटील यांनी लक्ष वेधले.

भाजपचे इतर नेतेही अनिल देशमुखांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. अनिल देशमुखांनी नैतिक जबाबदारी समजून आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भंडारा-गोंदिया लोकसभा खासदार सुनील मेंढे यांनी केला आहे. भाजप नेहमी वाजे प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत असतांना राष्ट्रवादी व काॅंग्रेसचे लोक अनिल देशमुख दोषी नसल्याचा कांगावा करत होते मात्र आता CBI चौकशीत सर्व समोर येणार असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख