ग्रामपंचायत निवडणूक ; भाजप म्हणतेय, आम्हीच नंबर वन - BJP says we are number one in gram panchayat election | Politics Marathi News - Sarkarnama

ग्रामपंचायत निवडणूक ; भाजप म्हणतेय, आम्हीच नंबर वन

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 18 जानेवारी 2021

तीन पक्ष एकत्र येऊनही भाजपला घवघवीत यश मिळाले. साम-दाम-दंड या सगळ्याचा वापर त्यांनी केला. पण तरीही ते भाजपला रोखू शकले नाहीत.

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली असून 14 हजार पैकी 6 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये आघाडी घेतली आहे. ही आघाडी आणखी वाढणार असून राज्यात भाजपच क्रमांक एकचा पक्ष असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होऊ लागल्यानंतर उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत घेत पक्षाने मिळविलेल्या ग्रामपंचायतींची माहिती दिली. तीन पक्ष एकत्र येऊनही भाजपला घवघवीत यश मिळाले. साम-दाम-दंड या सगळ्याचा वापर त्यांनी केला. पण तरीही ते भाजपला रोखू शकले नाहीत, असे त्यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दत्तक घेतलेली खटाव तालुक्यातील एलकुर ग्रामपंचायत भाजपने काबीज केली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कोकणातही भाजपला उल्लेखनीय यश मिळाले. त्यामुळे कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचा समज खोटा ठरला आहे. सिंधुदुर्गमध्ये ७० पैकी ५५ च्या जवळपास ग्रामपंचायतींमध्ये कमळ फुलले आहे. देवगडमध्ये २३ पैकी १७, वैभववाडीत १२ पैकी ९ ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळविले आहे.

मालवणमधील सहा पैकी पाच तर कुडाळमधील पाच पैकी चार ग्रामपंचायती जिंकत भाजपने मुसंडी मारली आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दत्तक घेतलेली तळेगाव ग्रामपंचायतही भाजपने ताब्यात घेतल्याचे उपाध्ये यांनी सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातही भाजपने अनेक ग्रामपंचायंतींमध्ये बाजी मारली आहे. मागील काही वर्षांपासून याठिकाणी मतदारांनी भाजपला साथ दिल्याचे उपाध्ये म्हणाले. राज्य सरकारने थेट सरपंच निवडणूक रद्द करून नंतर सरपंच निवडणार असा निर्णय घेतला. याबाबतही सरकारविरूध्द मोठी नाराजी गावांमध्ये दिसून आली. केंद्र सरकारने शेतीविषयक अनेक चांगले निर्णय घेतले. त्याची चर्चा ग्रामीण भागात झाल्याचे उपाध्ये यांनी नमुद केले.

अक्कलकोटमध्ये भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना धक्का

भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना अक्कलकोट तालुक्यात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिध्दराम म्हेत्रे यांनी बाजी मारल्याची चित्र दिसत आहे. तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकल्याने कल्याणशेट्टी यांना धक्कादायक निकालाला सामोरे जावे लागले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत सचिन कल्याणशेट्टी यांनी म्हेत्रे यांचा तालुक्यात दणदणीत पराभव केला होता. पण ग्रामपंचायत निवडणुकीत म्हेत्रे यांनी आपले वचर्स्व अबाधित राखण्यात यश मिळविले आहे. 

चंद्रकांत पाटलांच्या गावात शिवसेनेचा झेंडा 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर (ता. भुरदगड, जि. कोल्हापूर) ग्रामपंचायतींवर शिवसेनेने आपला भगवा झेंडा फडकवला आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखालील या पॅनेलाला विरोध करण्यासाठी भाजप, कॉंग्रेस व राष्ट्रवादीने केलेले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. 

माजी मंत्री राम शिंदे यांच्या गावातच भाजप पराभूत

माजी मंत्री भाजप नेते राम शिंदे यांच्या चौंडी गावात भाजपच्या पॅनलचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ पैकी सात जागा जिंकत सत्ता परिवर्तन केले. हा राम शिंदेंना मोठा धक्का मानला जात आहे. आमदार रोहित पवार यांचे जामखेड तालुक्यातील वर्चस्व वाढत असल्याचे या निकालांमुळे स्पष्ट होत आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख