BJP MLA Santosh Danve criticizes the government | Sarkarnama

राज्य सरकारची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने..दानवेंचा आरोप  

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

राज्य सरकारची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने सुरु असल्याचा हल्लाबोल भाजप आमदार संतोष दानवे यांनी केला आहे.

जालना : मराठा महासंघाचे कार्यकर्ते पालकमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. निवेदन स्वीकारणं पालकमंत्र्यांसाठी काही अवघड गोष्ट नाही. पण या सरकारला जनतेला वेठीस धरायचं आहे. त्यामुळे राज्य सरकारची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने सुरु असल्याचा हल्लाबोल भाजप आमदार संतोष दानवे यांनी केला आहे. आज मराठा महासंघाच्या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याना पोलिसांनी ज्या पद्धतीने ताब्यात घेत अटक केली आहे. ही घटना निदंनीय असल्याची भावना ही आमदार संतोष दानवे यांनी यावेळी व्यक्त केली आहे. 

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी  मराठा महासंघाचे कार्यकर्त्यांनी गुरूवारी सकाळी आंदोलन केलं. जय जिजाऊ जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या विरोधात मराठा महासंघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. मराठा समाजातील महिला- पुरुषांनी हातात भगवे आणि काळे झेंडे घेऊन आंदोलन केले. 

मराठा समाजातील मुलांना शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण देण्यात यावे, आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यात यावी, सारथी संस्थेला निधी उपलब्ध करून द्यावा, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा योजनेचा लाभ द्यावा, एईसीबीसी विद्यार्थ्याना आर्थिक सवलती सुरू ठेवाव्यात अशा विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले.  

...मराठा आरक्षणाशिवाय पोलिस भरती नको..
मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या खंडपीठासमोर आहे. यामुळे राज्य सरकारने पोलिस भरती करू नये, पोलिस भरती थांबविली नाही, तर मराठा समाजाचा आक्रोश रस्त्यावर दिसेल, असा इशारा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी राज्य सरकारला दिला आहे. मराठा आरक्षण सध्या न्यायप्रविष्ठ असताना, राज्य सरकार पोलिस भरती का करीत आहे, असा प्रश्न संभाजी राजे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी टि्वट केलं आहे. ते म्हणतात की सरकारनं मराठा समाजाला चिथावणी दिली आहे. सरकारचं टाइमिंग चुकलं आहे. मराठा आरक्षणाशिवाय ही पोलिस भरती करू नये. याबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे, असं टि्वट संभाजी राजेंनी केलं आहे. 
 
 ..तो पर्यंत नोकरभरती नको : संभाजी ब्रिगेड 
मराठा समाजातील मुलांच्या शिक्षण आणि नोकरीमधील आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे या समाजातील मुलांसमोर मोठा प्रश्न उभारला आहे, त्यामुळे जोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत कोणतीही नोकरभरती सरकारने करू नये, अशी मागणी  संभाजी ब्रिगेडने केली आहे. समाजात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे, या बाबत सरकारला जाग यावी, यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांच्या नेतृत्त्वाखाली लाल महालसमोर नुकतेच मशाल आंदोलन करण्यात आले.  
 Edited  by : Mangesh Mahale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख