आनंदराव पाटील यांच्या नवीन इनिंगकडे लक्ष

आमदारकीचा कालावधी संपपेर्यंत नानांनी कोणत्याच पक्षात प्रवेश केला नाही. मात्र, त्यांचे घरचे शिलेदार भाजपमध्ये आहेत. मुरब्बी राजकारण करत विविध पदे भोगणाऱ्या नानांची राजकारणाची दिशा नक्की काय असेल, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.
MLC Anandrao Patil
MLC Anandrao Patil

कऱ्हाड : माजी मुख्यंमत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक मात्र, विधानसभा निवडणुकीपासून त्यांच्यापासून दुरावलेले आमदार आनंदराव पाटील ऊर्फ नाना यांच्या आमदारकीची मुदत जूनच्या पहिल्या आठवड्यात संपत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत नाराजी दाखवत नानांनी आमदार चव्हाण यांच्या गटापासून फारकत घेतली होती. केवळ काही तांत्रिक कारणाने आमदारकीचा राजीनामा दिलेला नव्हता, अन्यथा नाना पूर्णतः भाजपच्या गोटात सामील झाले होते. त्यांचे पुतणे सुनील पाटील यांच्यासह त्यांचे पुत्र प्रताप व मानसिंग यांनी भाजपत प्रवेश केला आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदारकी गेल्यावर नाना नेमकी काय भूमिका घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

कोरोनासोबतच विधानपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा सध्या कऱ्हाडात गाजत आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व आमदार आनंदराव पाटील यांची विधानपरिषदेतील आमदारकीची मुदत जूनच्या पहिल्या आठवड्यात संपत आहे. नाना म्हणजे पृथ्वीराज चव्हाण असे जिल्ह्याच्या काँग्रेसचे समीकरण गेली कित्येक वर्षे सुरू होते.

मात्र, त्याला विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीच्या काळात तडा गेला. तेथूनच पृथ्वीराज चव्हाण व नाना यांच्यातील दरी वाढत गेली. पक्षांतर्गत गटाबाजीला वैतागलेल्या नानांनी थेट मेळावा घेऊन कार्यकर्त्यांचा कोनोसा घेत भाजपशी संपर्क वाढविला. भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले यांच्याशी नाना गटाची बांधिलकी वाढली. पृथ्वीराज चव्हाण साहेब, तुमची डायरीच आमच्या हाताला लागली आहे, आता सावध राहा, असे जाहीर इशारा अतुल भोसले यांनी दिला होता.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही भेटीगाठी झाल्या होत्या. नानांनी पक्षातील गटबाजी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मांडली होती. विधानसभा ऐन रंगात येऊ लागताना या सगळ्या घटना घडत होत्या. काय करावे, याचा निर्णय घेण्याची निर्वाणीची वेळ आहे, असे सातत्याने श्री. पाटील सांगत  होते. त्याचा पारिपाक म्हणून पुतणे सुनील पाटील व दोन्ही मुले त्यांनी भाजपच्या गोटात धाडली.

मात्र, नानांनी त्यावेळेपासून आजअखेर पक्षप्रवेश केलेला नाही. नानांची सारे सैन्य विधानसभेला भाजपच्या बाजूने होते. मात्र, नानांनी कोणताही निर्णय जाहीर केला नव्हता. त्यांनी अंतर्गत हालचाली केल्या असतील. मात्र, सार्वजनिक भूमिका त्यांनी गुलदस्त्यात ठेवली होती. नानांनी फारकत घेण्याचे जाहीर केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह त्यांच्या गटातून काहीही प्रतिक्रिया आजअखेर आलेली नाही.

नानांनीच पक्षांतर्गत कलहाकडे बाबा दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले. मलकपूरचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे, युवकचे सरचिटणीस शिवराज मोरे यांच्याशी आनंदराव पाटील यांचे मतभेद झाले. त्या मतभेदाचे मनभेदात रूपांतर झाले. त्याची जाहीर चर्चा व्हावी, अशी कृत्ये दोन्ही गटांकडून झाली. पोलिसांत तक्रारीही झाल्या. त्यामुळे गटांतर्गत शीतयुद्ध अंतर्गत पेटले.

त्याचा परिणाम विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीवर झाला. मलकापूर पालिका निवडणुकीतही ते दिसून आले. त्या सगळ्या घडामोडीत नानांना पक्षातून काढण्याची मागणी होत होती. त्याअनुषंगाने आमदार चव्हाण यांच्यावर निर्णय घेण्याची वेळ आली होती. मात्र, निर्णय काय झाला, ते सर्वांना माहिती आहे. आमदारकीचा कालावधी संपपेर्यंत नानांनी कोणत्याच पक्षात प्रवेश केला नाही.

मात्र, त्यांचे घरचे शिलेदार भाजपमध्ये आहेत, हेही स्वीकारावे लागेल. आता प्रत्यक्षात नानांच्या आमदारकीची जूनच्या पहिल्या आठवड्यात मुदत संपत आहे. त्यामुळे मुरब्बी राजकारण करत विविध पदे भोगणाऱ्या नानांची राजकारणाची दिशा नक्की काय असेल, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.



 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com