माजी आमदार अरविंद चव्हाण यांची राष्ट्रवादीत " घरवापसी '; भाजपला दणका

माजी आमदार अरविंद चव्हाण यांची राष्ट्रवादीत " घरवापसी '; भाजपला दणका

बदनापूर : बदनापूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी भाजपला अखेरचा रामराम ठोकत पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या काही वर्षांपासून भाजपवर नाराज असल्याने मध्यंतरी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतली होती. तेव्हाच अरविंद चव्हाण यांच्या घरवापसीचे संकेत मिळाले होते आणि घडलेही तसेच. आगामी लोकसभा आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोडांवरच अरविंद चव्हाण यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यामुळे याचा फटका भाजपला बसण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

अरविंद चव्हाण यांनी शुक्रवारी दुपारी मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंढे व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. अरविंद चव्हाण यांनी 2014 मध्ये ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपमध्ये प्रवेश केला होता. जालन्यातून त्यांना उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेचे अर्जून खोतकर आणि कॉंग्रेसचे कैलास गोरंट्याल यांच्यात थेट लढत झाल्यामुळे मोदी लाटेतही अरविंद चव्हाण तिसऱ्या क्रमाकांवर फेकले गेले. ऐनवेळी उमेदवारी मिळाल्यावरही त्यांनी 35 हजारावर मते घेतली. पण त्यांचा पराभव झाला. 

दरम्यान, जिल्ह्यात भाजपचे सर्वेसर्वा असलेल्या खासदार रावसाहेब दानवे यांच्याशी त्यांचे फारसे सख्य दिसून आले नाही. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे निकटवर्तीय अशीच त्यांची ओळख होती. एकूणच भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळे त्यांची अलीकडे पक्षात राजकीय कोंडी केली जात होती. भाजप व अंगीकृत संघटनेच्या कार्यक्रमातून चव्हाण यांना जाणीवपूर्वक डावलले जात होते. त्यामुळे घुसमट होत असलेल्या अरविंद चव्हाणांनी सोशल मीडियावर व्यक्त होत आपल्या राष्ट्रवादी प्रवेशाचे संकेत दिले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही संधी साधत त्यांच्याशी संपर्क वाढवला आणि त्याची परिणीती राष्ट्रवादीत चव्हाण यांच्या प्रवेशाने झाली. 

राष्ट्रवादीकडूनच आमदार होण्याचा मान.. 
अरविंद चव्हाण यांनी बदनापूर विधानसभा मतदारसंघातून तीन निवडणुका लढविल्या होत्या. 1995 मध्ये कॉंग्रेस तर 1999 ला अपक्ष म्हणून त्यांनी नशीब आजमावले होते. पण या दोन्ही निवडणूकीत त्यांच्या पदरी पराभवच आला. 2004 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढवली आणि तिसऱ्या प्रयत्नांत अरविंद चव्हाण आमदार झाले. शिवसेनेच्या उमेदवाराचा साडेसात हजार मतांनी पराभव करत त्यांनी विधानसभा गाठली होती. आमदारकीचा कार्यकाळ अडीच वर्षाचा असतांनाच बदनापूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव झाला. त्यामुळे त्यांना पुन्हा बदनापूरमधून निवडणूक लढविण्याची संधी मिळाली नाही. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात असताना त्यांचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार (कै.) अंकुशराव टोपे यांच्याशी राजकीय मतभेद होते. त्यामुळे त्यांची प्रबळ इच्छा असताना त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षपद मिळाले नाही, असे बोलले जाते. त्यामुळे 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. बदनापूर व जालना तालुक्‍यात अरविंद चव्हाण यांना मानणारे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा अनेकांनी त्यांच्यासोबत भाजपची वाट धरली होती. आता अरविंद चव्हाण यांची घरवापसी झाल्याने त्यांचे समर्थकही मोठ्या प्रमाणात परततील आणि याचा निश्‍चितच जालना व बदनापूर तालुक्‍यात भाजपला फटका बसेल. बदनापूर विधानसभा मतदार संघातून जुन्या काळात अरविंद चव्हाण यांचे वडील (कै.) बाजीराव चव्हाण व त्यांचे काका आप्पासाहेब चव्हाण आमदार झाले होते. त्यामुळे बदनापूर मतदार संघावर "चव्हाण' घराण्याचा पगडा दिसून आला आहे. 
दरम्यान, माजी आमदार अरविंद चव्हाण यापूर्वी जिल्हा परिषदेचे सभापती व जालना सहकारी साखर कारखान्याचे पाच वर्षे सभापतीही होते. राजकीय, सहकार व सामाजिक क्षेत्रातील विविध पदांवर त्यांनी काम केल्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com