हडपसर (पुणे) : पुणे शहरालगतची २३ गावे महापालिकेत लवकरच समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकार घेण्यास अनुकुल असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत दिली. तसे केल्यास त्याचा पक्षाला कसा फायदा होईल, राजकीय परिणाम काय होईल, महापालिकेत किती नगरसेवक वाढतील तसेच स्वतंत्र हडपसर महापालिकेची निर्मिती करावयाची का ? याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी याचा निर्णय तातडीने कळवावा, अशी सूचना पवार यांनी स्थानिक नेत्यांना केली आहे.
आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीचे नेते व अजित पवार यांनी हे पाऊल उचलले असून याची जबाबदारी आमदार चेतन तुपे व सुनील टिंगरे यांच्यावर सोपवली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सर्कीट हाउस येथे पवार यांची भेट घेतली. त्यात खासदार वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, माजी महापौर वैशाली बनकर, प्रशांत जगताप, दत्ता धनकवडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, सुभाष जगताप, अश्विनी कदम आणि श्रीकांत पाटील यांचा समावेश होता.
महापालिका आणि रहिवाशांना या निर्णयाच होणार फायदा... https://t.co/edqiEj6PbN
— Sarkarnama (@MySarkarnama) August 23, 2020
२०१४ पूर्वीच शहरालगतची ३४ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता; मात्र या भागात राष्ट्रवादी व काँग्रेसचे वर्चस्व असल्याने ही गावे पालिकेत समाविष्ट करू नयेत, अशी भूमिका भाजप सरकारने घेतली व ३४ गावांपैकी केवळ ११ गावेच पालिकेत समाविष्ठ केली. राज्यात आता पून्हा महाआघाडीचे सरकार आल्याने भाजपाला शह देण्यासाठी उर्वरीत २३ गावे महापालिकेत समाविष्ठ करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
स्वतंत्र हडपसर महापालिकेस काही नेत अनुकूल आहेत, तर काहींचा त्याला विरोध असल्याचा सूर बैठकीत होता. स्वतंत्र महापालिका करावयाची झाल्यास राज्यसरकारने विकास कामांसाठी दरवर्षी दीड हजार कोटी रूपये नवीन महापालिकेस दिल्यास आमची स्वतंत्र महापालिका करण्यास तयारी असल्याचे काही नेत्यांनी पवार यांना सांगितले. तर नवीन महानगरपालिका झाल्यास महापालिकेला उत्पन्न कोठून मिळणार व विकास कामे कशी होणार, असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे स्वतंत्र हडपसर महापालिका होणार की, नाही याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
नव्याने समाविष्ठ होणारी ही आहेत गावे
बावधन, किरकटवाडी, म्हाळुंगेस, सूस, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, न-हे, खडकवासला, शेवाळेवाडी, नांदोशी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, कोळेवाडी, मंतरवाडी, येवलेवाडी, हांडेवाडी, होळकरवाडी, वडाची वाडी, पिसोळी, जांभूळवाडी, कोळेवाडी, गुजर निबांळकरवाडी
Edited by : Mangesh Mahale

