दोन कोटींची लाच मागणाऱ्या DySP च्या घरावर छापा; मिळाली इतकी रक्कम

एसीबीच्या मुख्यालयातून झाली कारवाई..
दोन कोटींची लाच मागणाऱ्या DySP च्या घरावर छापा; मिळाली इतकी रक्कम
acb pal

मुंबई : परभणीतील उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस नाईकाला दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली. तक्रारदार व्यावसायिकाची एक ध्वनिफीत प्रसारित झाली होती. त्यावरून तक्रारदाराविरोधात कारवाई न करण्यासाठी लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अटकेनंतर एसीबीने अधिकाऱ्याच्या दादर येथील फ्लॅटमध्येही शोधमोहीम राबवली. तेथून सुमारे २५ लाखांची रोख जप्त करण्यात आली. (ACB raids home of DySP Rajendra Pal)

परभणीतील सेलू विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल (५५) व पोलिस नाईक गणेश चव्हाण (३७) अशी अटक आरोपींची नावे आहेत. ३ मे रोजी तक्रारदाराच्या मित्राचा दुर्घटनेत मृत्यू झाला होता. याप्रकरणी परभणीतील सेलू पोलिस ठाण्यात निष्काळजीचा गुन्हा दाखल केला होता. त्यात एकाला स्थानिक पोलिसांनी अटकही केली होती. त्यावेळी तक्रारदाराने त्याच्या कर्मचाऱ्याच्या दूरध्वनीवरून मृत मित्राच्या पत्नीला दूरध्वनी केला होता. त्यात काही वादग्रस्त संवाद झाले. ते संभाषण या कर्मचाऱ्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाले.

त्यानंतर त्याने एका दुसऱ्या कर्मचाऱ्याला पाठवले व त्यानंतर ते संपूर्ण परभणीत प्रसारित झाले. त्यानंतर पाल याने तक्रारदाराला त्याच्या कार्यालयात बोलावून घेतले. त्या वेळी ‘तुझी प्रसारित झालेली ध्वनिफीत मी ऐकली असून, त्यातून बाहेर पडायचे असल्यास मला दोन कोटी रुपये दे,’ अशी मागणी पाल यांनी केली. त्यानंतर तडजोडीअंती दीड कोटी रुपये स्वीकारण्यास पाल तयार झाले.

त्यानंतरही पाल तक्रारदाराला नियमित दूरध्वनी करून पैशांची मागणी करत होते. ही रक्कम देण्याची इच्छा नसल्यामुळे अखेर तक्रारदाराने याप्रकरणी थेट मुंबई एसीबी व महासंचालक कार्यालयात येऊन याबद्दल तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मुंबई एसीबीच्या पथकाने सापळा रचून प्रथम पाल यांचा सहकारी पोलिस नाईक चव्हाणला लाचेचा पहिला १० लाखांचा हप्ता स्वीकारताना शुक्रवारी रात्री अटक केली. त्यानंतर पाल यांनाही शनिवारी पहाटे याप्रकरणी अटक केली. या अटकेनंतर पालच्या मुंबईतील दादर येथील निवासस्थानी शोधमोहीम राबवण्यात आली. तेथे २४ लाख ८४ हजारांची रक्कम सापडली. त्यामुळे याप्रकरणी असंपदेचा गुन्हाही दाखल करता येऊ शकतो का, याबाबत एसीबी पडताळणी करत आहे.

Related Stories

No stories found.