गंगापूर कारखान्यात १५ कोटींचा गैरव्यवहार; आमदार प्रशांत बंब यांच्यासह १६ जणांविरुद्ध गुन्हा - 15 crore fraud in Gangapur factory; Crime against 16 people including MLA Prashant Bamb | Politics Marathi News - Sarkarnama

गंगापूर कारखान्यात १५ कोटींचा गैरव्यवहार; आमदार प्रशांत बंब यांच्यासह १६ जणांविरुद्ध गुन्हा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत बंब आणि प्रभारी संचालकर एम.बी. पाटील यांनी २० जुलै रोजी ही रक्कम कारखान्याच्या नावे बेकायदेशीररित्या खाते उघडून तक्रारीत नमूद करण्यात आलेल्या व्यक्तींच्या नावे जमा केली. नवीन बॅंक खाते उघडण्यासाठी जो ठराव घेण्यात आल्याचे सांगितले जाते, तो देखील बनवाट असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

औरंगाबाद ः गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यासह १६ जणांवर बनावट कागदपत्रे तयार करून गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची तब्बल १५ कोटी ७५ लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्याज वाटपाच्या नावाखाली जास्तीची रक्कम बेकायदेशीरपणे वापरल्याची फिर्याद गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे सभासद कृष्णा पाटील डोणगांवकर यांनी दिली होती. त्याूनसार काल रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.

गंगापूर सहकारी साखर कारखाना हा गेल्या कित्येक वर्षापासून बंद आहे. राज्य सरकारने या कारखान्यावरील कर्जाच्या वसुलीसाठी जप्तीची कारवाई देखील केली आहे. संबंधित बॅंकांनी कारखाना विक्रीला काढल्यानंतर त्यावेळच्या संचालक मंडळाने न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर कारखान्याने गंगापूर न्यायालयात काही रक्कम जमा केली. त्यामुळे कारखाना विक्रीचा निर्णय रद्द करण्यात आला होता. न्यायालयाकडून कारखान्याच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम अनेक वर्षांच्या व्याजामुळे १५ कोटी ७५ लाखांहून अधिक झाली.

७ नाेव्हेंबर २०२० रोजी कारखान्याला सदरील रक्कम परत मिळाली होती. परंतु कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत बंब आणि प्रभारी संचालकर एम.बी. पाटील यांनी २० जुलै रोजी ही रक्कम कारखान्याच्या नावे बेकायदेशीररित्या खाते उघडून तक्रारीत नमूद करण्यात आलेल्या व्यक्तींच्या नावे जमा केली. नवीन बॅंक खाते उघडण्यासाठी जो ठराव घेण्यात आल्याचे सांगितले जाते, तो देखील बनवाट असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शिवाय हे खाते उघडतांना कारखान्याची भागिदारी असल्याचे दाखवण्यात आले होते. प्रशांत बंब आणि एम.बी. पाटील हे दोघे कारखान्याचे भागिदार असल्याचे बनावट कागदपत्र त्यासाठी तयार करण्यात आले.

कारखाना हा वित्तीय संस्था नसल्यामुळे त्यांना व्याज वाटण्याचा कोणताही अधिकार नाही. तरी देखील कारखान्याला मिळालेली रक्कम विविध खात्यांमध्ये टाकण्यात आली आहे. बँकेच्या खात्यावर जमा झालेल्या पैशांचा कारखान्याशी काहीही संबंध नाही, असं कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब व त्यांच्या काही संचालकांनी म्हटलं असल्याची तक्रार कारखान्यातील सभासदांनी एकत्र येत केली आहे. या प्रकरणी प्रशांत बंब, एम.बी. पाटील यांच्यासह सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या संदर्भात आमदार प्रशांत बंब यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख