भाजपचे 12 निलंबित आमदार लवकरच विधानसभेत दिसणार?
supreme courtSarkarnama

भाजपचे 12 निलंबित आमदार लवकरच विधानसभेत दिसणार?

भाजपच्या (BJP) 12 निलंबित आमदारांवर करण्यात आलेल्या कारवाईवर आज सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

नवी दिल्ली : राज्यातील भाजपच्या (BJP) 12 निलंबित आमदारांना सुप्रीम कोर्टाकडून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज (ता.11 जानेवारी) सुप्रीम कोर्टात दिवसभर झालेल्या युक्तिवादात सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) या कारवाईवरुन महाराष्ट्र सरकारवर (Maharashtra State Government) ताशेरे ओढले. आमदारांचे निलंबन हा सर्वस्वी सभागृहाचा निर्णय असला तरी 60 दिवसांपेक्षा अधिक काळासाठी ते करता येणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. तसेच, ही निलंबनाची कारवाई बरखास्तीपेक्षाही जास्त कडक असल्याचे सुनावत या आमदारांचे निलंबन म्हणजे त्यांच्या मतदारसंघास शिक्षा, असेही निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 18 जानेवारीला होणार आहे.

supreme court
भाजपचे तेरा आमदार पक्ष सोडणार; शरद पवारांनी टाकला बॉम्ब

निलंबन करण्यात आलेल्या बारा आमदारांच्या याचिकेवर आज न्यायमूर्ती अजय खानविलकर व न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली. राज्य सरकारच्या वकिलांनी राज्य प्रतिसादासाठी कोर्टाकडे अधिकचा वेळ मागून घेतला आहे. यामुले पुढील सुनावणी ही मंगळवारी (ता.18 जानेवारी) होणार आहे. आजच्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्र सरकारच्यावतीने निलंबनाच्या कारवाईत कोर्ट सहसा ढवळाढवळ करत नाही हा सभागृहाचा अधिकार असतो, असा युक्तीवाद करण्यात आला. मात्र, या कारवाईत आमदारांनाच नाहीतर घटनात्मक मूल्यांनाही शिक्षा होत असल्याचे मत कोर्टाने नोंदवत राज्य सरकारला चांगलेच फटकारले आहे.

दरम्यान, ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्राकडून इम्पेरिकल डेटा मिळावा यासाठी विधानसभेत ठराव मांडण्यात आला होता. यावेळी अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी या 12 आमदारांना एका वर्षांसाठी 5 जुलै 2021 मध्ये महाराष्ट्र विधानसभेने ठराव करत निलंबन केले होते. यानंतर निलंबनाच्या कारवाईविरोधात या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आशिष शेलार, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण कुचे, पराग आळवणी, अभिमन्यू पवार, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, हरिश पिंपळे, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया यांचे निलंबन करण्यात आले असून त्यांना मुंबई आणि नागपूर विधीमंडळाच्या आवारात एका वर्षासाठी येण्यास बंदी घातलेली आहे.

supreme court
राष्ट्रवादी आणि शिवसेनेसमोर काँग्रेसचे मंत्री झाकोळले?; पाहा व्हिडिओ

आमदार संजय कुटेंची महाविकास आघाडी सरकारवर टीका

आज सुप्रिम कोर्टाने आज राज्य सरकारला 12 आमदारांच्या निलंबनावरुन फटकारले. या पार्श्वभूमीवर निलंबित 12 आमदांरापैकी आमदार संजय कुटेंनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, आम्ही जनतेचे प्रश्न विधिमंडळात मांडत असतांना आमच्यावर षडयंत्र करून निलंबन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारकडून आम्हालाच नाही तर जनतेला सुद्धा अपेक्षा नाही. या सरकारकडून आवाज दाबला जात असल्याचा आरोपही त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला. तसेच, आमच्यावर करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी आम्हाला विधिमंडळाकडून अपेक्षा नाही. मात्र, आम्हाला सुप्रिम कोर्टाकडून निश्चित न्याय मिळेल, असा विश्वासही कुटेंनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in