काँग्रेसचे उद्या राज्यव्यापी आंदोलन..जेईई-नीट परीक्षा पुढे ढकला! - Congress's state-wide agitation tomorrow  | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसचे उद्या राज्यव्यापी आंदोलन..जेईई-नीट परीक्षा पुढे ढकला!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

प्रदेश कॉंग्रेस उद्या (शुक्रवारी) सकाळी 11 वाजता सर्व जिल्ह्यांत केंद्र सरकारच्या कार्यालयांसमोर आंदोलन करणार आहे.

मुंबई : ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे जेईई व नीट परीक्षा घेण्याच्या हट्टामुळे केंद्र सरकार विद्यार्थ्यांना मोठ्या संकटात ढकलत आहे. मोदी सरकारच्या या आडमुठ्या, हटवादी भूमिकेला विरोध करत परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, या मागणीसाठी शुक्रवारी (ता. 28) राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

खासदार राहुल गांधी यांनीही विद्यार्थ्यांच्या आरोग्य व भविष्याची चिंता व्यक्त करत या परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी केली आहे. एसएसयूआयनेही केंद्र सरकारच्या विरोधात उपोषणाचा इशारा दिलेला आहे. प्रदेश कॉंग्रेस शुक्रवारी सकाळी 11 वाजता सर्व जिल्ह्यांत केंद्र सरकारच्या कार्यालयांसमोर आंदोलन करणार आहे. बाळासाहेब थोरात हे मुंबई येथील आंदोलनात सहभागी होणार आहेत. आंदोलन करताना सुरक्षित अंतर पाळावे, मास्क लावावा व कोरोनासंदर्भात सरकारने घालून दिलेल्या सर्व अटी-नियमांचे पालन करावे, असे आवाहनही थोरात यांनी केले आहे.

 
कोरोनाचे संकट अजूनही गंभीर असताना केंद्रातील मोदी सरकार जेईई व नीट परीक्षा घेण्यावर ठाम आहे. लाखो विद्यार्थी व पालकांना त्यांच्या आरोग्याची व सुरक्षेची चिंता सतावत असताना मोदी सरकार मात्र, अशा गंभीर परिस्थितीतही परीक्षा घेण्याचा हट्ट सोडायला तयार नाही. दररोज कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत असताना केंद्रात जाऊन परीक्षा देण्यास लाखो विद्यार्थ्यांना सक्ती करणे म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळण्याचा अघोरी प्रकार आहे. परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वाहतूक व्यवस्थाही अजून झालेली नाही. जेईई परीक्षेसाठी तब्बल साडेआठ लाख विद्यार्थी बसलेले आहेत. 

एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा देण्यास एकत्र आल्यास कोरोना संक्रमणाची भीती नाकारता येत नाही. एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे बिहार, आसाममध्ये गंभीर पूरस्थिती आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास भाग पाडून त्यांच्यावर मानसिक दडपण आणण्याचा हा प्रकार आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीतही या परीक्षा घेण्यास विरोध करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या परीक्षा घेण्याच्या भूमिकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
 Edited  by : Mangesh Mahale      

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख