युवक काँग्रेस देणार राज्यभरातील एक हजार युवकांना नेतृत्वाची संधी - Youth Congress will give leadership opportunity to one thousand youth across the state | Politics Marathi News - Sarkarnama

युवक काँग्रेस देणार राज्यभरातील एक हजार युवकांना नेतृत्वाची संधी

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

काँग्रेसने युवकांना नेहमीच संधी दिली. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याच स्वप्नाला भरारी देण्याचा प्रयत्न युवक काँग्रेस करत आहे. युवकतर्फे सुपर 1000 असा युवकांसाठी महत्वाकांक्षी उपक्रम घेतला आहे.

कऱ्हाड : राज्यभरात आगामी काळात येऊ घातलेल्या महापालिका, पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत युवकांना स्थान मिळाले पाहिजे. त्यांच्या हातात नेतृत्व आले पाहिजे, यासाठी युवक काँग्रेसने सुपर १००० उपक्रम राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व या उपक्रमाचे राज्य समन्वयक शिवराज मोरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली मोहिम राबविण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभ आज कऱ्हाडातून झाला. त्यावेळी युवक काँग्रेसचे सहप्रभारी प्रदीप सिंधव, युवकचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, युवक काँग्रेस जिल्हा प्रभारी अजय इंगवले, युवक काँग्रेसचे सचिव उमेश ताटे, महासचिव अभिजित चव्हाण उपस्थित होते. 

श्री. मोरे म्हणाले, काँग्रेसने नव्या नेतृत्वांना नेहमीच संधी दिली. मात्र, अलीकडच्या सात वर्षांपासून देशाची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती बदलली आहे. लोकांत धर्माच्या भिंती उभ्या करून त्यांच्यात फूट पाडली जात आहे. युवक बेरोजगार होत आहेत. त्यांचा गैरवापर केला जातो आहे. देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. सत्तेच केंद्रीकरणामुळे लोकशाही धोक्यात आली आहे.

देशात फॅसिस्ट शक्ती डोकं वर काढत आहेत. अशा स्थितीत पर्याय शोधण्यापेक्षा राजकारणाला समाजकारणाचा पर्याय देण्याचा विचार केला आहे. काँग्रेसने युवकांना नेहमीच संधी दिली. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याच स्वप्नाला भरारी देण्याचा प्रयत्न युवक काँग्रेस करत आहे. युवकतर्फे सुपर 1000 असा युवकांसाठी महत्वाकांक्षी उपक्रम घेतला आहे.

त्याच्या माध्यमातून पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन राज्यातील एक हजार युवकांना सकारात्मक राजकारण करण्यासाठी प्रशिक्षण देणार आहोत. उपक्रमाच्या माध्यमातून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांत एक हजार युवकांना संधी देण्याचा युवक काँग्रेसचा मानस आहे.

युवकांना प्रशिक्षण देऊन नवा भारत घडवण्यासाठी त्यांच्या ऊर्जेचा सकारात्मक उपयोग व्हावा, असा आमचा प्रयत्न आहे. युवक काँग्रेसच्या सुपर 1000 उपक्रमात सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे. तो भरून या उपक्रमात सहभागी व्हावे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख