कोरोनात उदयनराजेंचा फिटनेस फंडा....  - Udayan Raje Bhosale has also emphasized on his fitness. For that, they have changed their routine. | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनात उदयनराजेंचा फिटनेस फंडा.... 

उमेश बांबरे
बुधवार, 1 जुलै 2020

दररोज पहाटे लवकर उठतात. बरोबर सकाळी सहा वाजता ते कास पठारावरील निसर्ग रम्य वातावरणात जातात. तेथे सकाळी सहा ते सात एकतास ते सुमारे दहा किलोमीटर वॉकिंग करतात. वॉकिंग झाल्यानंतर सात वाजता ते शास्त्रशुध्द पध्दतीने योगा करतात.

सातारा : कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येकजण आपापली काळजी घेत आहे. साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही आपल्या फिटनेसवर भर दिला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या दिनचर्येत बदल केला आहे. सकाळी सहा ते दहा यावेळेत वॉकिंग, योगा, प्राणायाम करण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्यांच्या या बदललेल्या दिनक्रमाचे सातारकर कौतूक करू लागले आहेत.

उदयनराजेंच्या या फिटनेस फंड्याची सध्या सातारा जिल्ह्यात चर्चा आहे. उदयनराजे व त्यांची स्टाईल तरूणांना नेहमीच मोहात पाडते. त्यांच्या स्टाईलचे इतर काही नेतेमंडळी अनुकरण करतात पण उदयनराजेंइतका प्रतिसाद इतर कोणत्याही नेत्याला मिळत नाही. सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व नेते दुसऱ्याला उपदेश
देण्याचे काम करतात.

घराबाहेर पडू नका, स्वत:ची काळजी घ्या, मास्क, सॅनिटायजर वापरा, सोशल डिस्टसिंग पाळा.. असे सांगत असतात. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करणारे कमीच आहेत. पण खासदार उदयनराजेंनी सर्वांना कोरोनाला घाबरू नका, फिट
रहा, असा सल्ला देत स्वतःच्या फिटनेसवरीही भर दिला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या  दैनंदिन जीवनशैलीत बदल केला आहे. तसेच फिटनेसला प्राधान्य दिले आहे. 

दररोज पहाटे लवकर उठतात. बरोबर सकाळी सहा वाजता ते कास पठारावरील निसर्ग रम्य वातावरणात जातात. तेथे सकाळी सहा ते सात एकतास ते सुमारे दहा किलोमीटर वॉकिंग करतात. वॉकिंग झाल्यानंतर सात वाजता ते योगासने करण्यास सुरवात करतात. शास्त्रशुध्द पध्दतीने योगा करता यावा त्यासाठी त्यांनी एक प्रशिक्षकही नेमला आहे.

साधारण नऊ वाजेपर्यंत त्याचा योगा चालतो. योगा केल्यानंतर प्राणायाम करतात. व्यायाम झाल्यानंतर ते जलमंदीर पॅलेसला साडे नऊपर्यंत येऊन सर्व आवरून बरोबर दहा वाजता ते जलमंदीर पॅलेसमधील त्यांच्या ऑफिसला उपस्थित राहतात. तेथे जनतेची कामे मार्गी लावून मगच त्याचा इतर दिनक्रम सुरू होतो. 

खासदार उदयनराजेंचा हा बदललेला दिनक्रम पाहून अनेकांनी त्यांच्यासोबत वॉकिंगला जाण्याचा मोह आवरत नाही. पण सोशल डिस्टसिंग पाळून ते व्यायाम करतात. त्याच्या या बदललेल्या दिनक्रमामुळे सातारकर त्यांचे कौतूक करू लागले आहेत. काही
समर्थकांनीही महाराजांचे अनुकरण करण्यास सुरवात केली आहे. तर जिल्ह्यातील तरूणाईला ही उदयनराजेंच्या फिटनेस फंड्यांचे कौतूक वाटू लागले आहे. 

 

 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख