बहीण-भावाच्या पुढे एक पाऊल; डॉ. अश्विनी वाकडे झाल्या आयएएस - After becoming a doctor, Ashwini Wakde became the Collector instead of MD | Politics Marathi News - Sarkarnama

बहीण-भावाच्या पुढे एक पाऊल; डॉ. अश्विनी वाकडे झाल्या आयएएस

हेमंत पवार
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

त्यांनी एम.बी.बी.एस.ला असल्यापासून तयारी सुरु केली होती. एमबीबीएस झाल्यावर त्यांनी एम.डी होण्याचे स्वप्न बाजूला ठेऊन आय.ए.एस अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी वाटचाल सुरू केली.

कऱ्हाड : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (२०१९) घेण्यात आलेल्या परीक्षेत डॉ. अश्विनी तानाजी वाकडे यांनी यश मिळविले आहे. त्या २०० व्या रॅंकने पास झाल्या आहेत. एमबीबीएस होऊनही मोठा भाऊ आणि बहीण हे वर्ग एकचे अधिकारी असल्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरुन दाखवले आहे. त्यांच्या दिमाखदार यशाने वाकडे फॅमिलाला चारचाँदच लागले आहेत.

डॉ.अश्विनी वाकडे यांचे मुळगाव धनगरवाडी (पोस्ट : उपळाई बुद्रूक, ता. माढा, जि. सोलापूर) आहे. लहानपणापासूनच त्या जिद्दी होत्या. त्यांचे वडील तानाजी वाकडे हे सेवानिवृत्त सहायक फौजदार असून आई सौ. कल्पना वाकडे ह्या गृहिणी आहेत. त्यांचे ज्येष्ठ बंधू अमरदिप वाकडे हे कऱ्हाड येथे तहसिलदार म्हणून कार्यरत असून त्यांच्या बहीण मीनाक्षी ठोके या लातूर येथे वित्त विभागामध्ये सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा धाकटा भाऊ शिक्षण घेत आहे. 

डॉ. अश्विनी यांचे प्राथमिक शिक्षण घेरडी (ता. सांगोला) येथे झाले असून त्यांची सहावीमध्ये जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षणासाठी निवड झाली होती. त्यानंतर बार्शी येथून १२ वीची परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन पहिल्याच प्रयत्नांमध्ये त्यांनी बी. जे. मेडिकल कॉलेज पुणे येथे प्रवेश घेऊन एम.बी.बी.एस.ची पदवी घेतली. त्यांचा मोठा भाऊ आणि बहिण हे राज्य लोकसेवा आयोगामार्फत वर्ग एकचे अधिकारी असल्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी मनी बाळगले होते. 

त्यासाठी त्यांनी एम.बी.बी.एस.ला असल्यापासून तयारी सुरु केली होती. एमबीबीएस झाल्यावर त्यांनी एम.डी होण्याचे स्वप्न बाजूला ठेऊन आय.ए.एस अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी वाटचाल सुरू केली. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी पुणे येथे सुरू केली. दिवसरात्र अभ्यास करुन, बहीण-भावांचे मार्गदर्शन घेऊन लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली. त्या परिश्रमाचे फळ म्हणून त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या परीक्षेत त्या यशस्वी झाल्या असून देशात २०० वा रँक त्यांनी पटकावला आहे. त्यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरल्यामुळे त्यांच्यापुढे आकाश ठेंगणे झाले आहे.

 

तहसिलदार भावाची अशीही जिद्द....

राज्य लोकसेवा आयोगाची अमरदिप वाकडे आणि मीनाक्षी ठोके या बहिण-भावांनी एकाच वर्षी परिक्षा दिली. त्यामध्ये मिनाक्षी यांना यश मिळाले आणि त्या वित्त विभागात सहाय्यक संचालक म्हणून नियुक्त झाल्या. तर अमरदीप यांना अपयश आले. त्यामुळे मिनाक्षी यांना खूप वाईट वाटले. त्यांना यश मिळुनही भावाला अपयश आल्याने रडू कोसळले. ही घटना अमरदीप यांना खटकल्याने त्यांनी वर्ग एकचा अधिकारी होण्याचा निर्धार केला. त्यानंतर त्यांनी दिलेल्या परिक्षेत ते पोलिस उपनिरीक्षक म्हणून राज्यात दहावे आले. त्यानंतर २०१२ मध्ये ते तहसीलदार झाले. त्यांनी बहिणीची इच्छा निर्धाराने पूर्ण केली.

 

माझ्या यशाचे श्रेय माझे आई-वडील भाऊ-बहीण यांना जाते. तरुण-तरुणींनी अपयशाने खचुन न जाता कठोर परिश्रम घेऊन एकाग्रचित्ताने अभ्यास केल्यास स्वप्न सत्यात उतरुन हमखास यश मिळतेच, हे मी सिध्द करुन दाखवले आहे.

- डॉ. अश्विनी वाकडे (आयएएस)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख