जयंतरावांच्या प्रदेशाध्यक्षपदाला तीन वर्षे पूर्ण : राष्ट्रवादीने केले या शब्दांत कौतुक

राष्ट्रवादीला सत्तेत आणण्याचा निर्धार जयंतरावांच्या कारकिर्दीत पूर्ण
jayant patil wets in rain
jayant patil wets in rain

मुंबई : जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आज तीन वर्षे पूर्ण होत आहेत. तेव्हा विरोधातील पक्ष सत्तेत आला आहे. राष्ट्रवादीनेही जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेल्या कारकिर्दीचा आढावा घेतला असून त्यांचे कौतुक केले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्रासमोरही एक आव्हानात्मक परिस्थिती उभी असताना शरद पवार यांनी  जयंत पाटील यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आणि त्यांनी ही जबाबदारी सक्षमपणे पेलली आहे, अशा शब्दांत पक्षाने त्यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

राष्ट्रवादी काॅंग्रेसने जयं पाटील यांच्याबद्दल लिहिलेले हे शब्द 

२९ एप्रिल २०१८ रोजी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यानंतर पक्षाच्या महाराष्ट्रातील वाटचालीला जयंत पाटील यांनी एक दिशादर्शक आयाम दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २०१४ साली विरोधी बाकावर बसावे लागले. जयंत पाटील यांनी प्रांताध्यक्ष म्हणून पक्षीय धोरणांमध्ये सकारात्मक ऊर्जा आलली. विरोधात असूनही पक्षाचे राजकीय तसेच सामाजिक स्थान जनतेच्या मनात उंचावण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम पक्षाच्या आढावा बैठकींना प्राधान्य दिले. संघटनात्मक रचना मजबूत करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले. हे सुरू असतानाच विधिमंडळात पक्षाच्या गटनेत्याची भूमिका बजावताना सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचे काम त्यांनी केले.

पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्यालादेखील नेत्यांशी थेट संवाद साधता यावा यासाठी पक्षाच्या आयटी सेलच्या माध्यमातून ‘NCPConnect’ हे ॲप तयार करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. पक्षातील कार्यकर्त्यांच्या बूथ कमिट्या सक्षम करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरला.

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात २०१९ साली आलेल्या महापुराने महाराष्ट्र पुरता खचला होता. यातच पक्षाचा हा खंबीर नेता युद्धपातळीवर आपली भूमिका चोख बजावत होता. या संकटात स्वतः पुरात उतरून त्यांनी लोकांना अन्नाचे वाटप केले. पूरग्रस्तांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून दिला. पक्षाच्या सर्व नेते-पदाधिकाऱ्यांना आवाहन करून अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचा पुरवठा पूर आलेल्या भागात करण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला.

पक्षाची अंतर्गत संरचना बूथ कमिट्यांच्या माध्यमातून सशक्त करतानाच राज्यातील जनतेचाही पक्षासोबत थेट संवाद राहावा, त्यांच्या समस्यांना व्यासपीठ मिळावे यासाठी अनेक राज्यव्यापी दौऱ्यांची यशस्वी आखणी जयंत पाटील यांनी या कालावधीत केली. १० जानेवारी २०१९ रोजी रायगड येथून छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन निर्धार परिवर्तन यात्रेची सुरुवात झाली. या यात्रेचा उद्देश बळीराजाला त्याचे हक्क मिळवून देण्याचा होता. नियोजनबद्ध रीतीने पक्षाची शेतकरीपूरक भूमिका जनतेपुढे मांडण्याचे काम यात्रेद्वारे करण्यात आले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना सत्ताधाऱ्यांच्या जनआशीर्वाद व महाजनादेश यात्रेला शह देण्यासाठी जयंत पाटील यांच्या पुढाकाराने ६ ऑगस्ट २०१९ रोजी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले गेले. यात राज्यातील ८० विधानसभा मतदारसंघात त्यांनी पक्षाची ताकद वाढवली. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना त्यातही मोलाची भूमिका त्यांनी बजावली आणि जयंत पाटील यांच्या कार्यकालात पक्षाला विरोधी बाकावरून सत्ताधारी बाकावर बसवण्याचा निर्धार पूर्ण झाला. 

नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर लगेचच अनेक आव्हानांचा सामना सरकारला करावा लागला. महाभयानक असे कोरोनाचे संकट राज्यावर ओढवले. या कठीण परिस्थितीशी सरकार लढत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनहिताची भूमिका जयंत पाटील यांनी प्रकर्षाने जपली. कोरोना काळात पक्षाच्या वतीने गरजूंना धान्यवाटप, अन्न वाटप, रेशन यांची मदत करण्याचे आवाहन जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असताना रक्तदान शिबीरे भरवण्याची तसेच अधिकाधिक कार्यकर्त्यांना रक्तादान करण्याची साद घालण्यात आली. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी रक्तदान मोहिम तसेच अन्य सामाजिक उपक्रम पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्तयाने हिरीरीने राबवले. राज्यातील जनतेला संकटकाळात दिलासा देण्यासाठी पक्षाने जंयत पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न केले.

पक्षाने २२ व्या वर्षात पदार्पण केले तेव्हा असलेल्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियान जाहीर केले. या अभियानांतर्गत जयंत पाटील यांनी ५ लाखांहून अधिक कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधण्याचा निर्धार केला. या अभियानास अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला. ४० दिवस चाललेल्या अभियानात एकूण ७ लाख ६१ हजार कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. कार्यकर्त्यांच्या समस्या व सूचना जाणून घेण्यात आल्या. यावरच न थांबता कार्यकर्ता केंद्रस्थानी ठेवून त्याच्याशी थेट संवाद साधण्यासाठी कोरोना परिस्थिती नियंत्रणात असताना २८ जानेवारी २०२१ रोजी परिवार संवाद यात्रा काढण्यात आली. थेट कार्यकर्त्यांना भेटून त्याचे मत जाणून घेण्याचा हा उपक्रम इतर पक्षांच्या तुलनेत नवीन व सकारात्मक असा होता. विदर्भातून या यात्रेची सुरुवात करत १८ दिवसांत ३००० हजार किलोमीटरचा टप्पा व १४ जिल्हे आणि ८४ मतदारसंघात यात्रा पोहचली. विदर्भातील अनेक प्रश्न तात्काळ मार्गी लावून जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांची व जनतेची मनं जिंकली. यादरम्यानच जनतेच्या समस्यांना थेट मंत्र्यांकडे व्यासपीठ मिळावे म्हणून पक्षातर्फे जनता दरबार हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचे य़शस्वी नियोजन जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. मात्र राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट जोर धरू लागल्यावर परिस्थिती आणि सामाजिक भानातून तात्काळ हे दोन्ही उपक्रम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. उपक्रम तात्पुरते थांबले तरी जयंत पाटील यांचा कार्यकर्त्यांशी संवाद थांबला नाही. आपण स्वतः कोरोनामुळे घरी क्वारंटाईन असतानाही जयंत पाटील यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर करत कार्यकर्त्यांशी संवाद सुरू ठेवला आणि त्यांना जनतेसाठी काम करण्यासंबंधीच्या सूचना वेळोवेळी दिल्या.

या तीन वर्षात सकारात्मक दृष्टिकोन ठेवत, सर्व घटकांना एकत्र घेऊन, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची वीण घट्ट करत पक्षाची ध्येय-धोरणे व संघटनात्मक बांधणीवर जयंत पाटील यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यांचे अभ्यासू, बुद्धीक्षम आणि धुरंधर व्यक्तिमत्व पक्षवाढीत आणि भावी जडणघडणीत निर्णायक ठरत आहे. ना. जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून ही कारकीर्द अशीच उंचावत राहो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पक्षाचा प्रत्येक घटक सकारात्मक वाटचाल करत राहोत या हार्दिक शुभेच्छा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com