`संभाजीनगर`साठी आग्रही असणारी शिवसेना, `धाराशीव`वर गप्प का?

आता तीन पक्षांचे सरकार, त्यात काॅंग्रेसचा संभाजीनगरला होत असलेला विरोध पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न असलेले संभाजीनगर `करून दाखवणार`, का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Shivsena on Sambhajinagar and Dharashiv news
Shivsena on Sambhajinagar and Dharashiv news

औरंगाबाद ः संभाजीनगर हा आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे, आम्ही गेल्या ३२ वर्षांपासून ही मागणी करतो आहोत, त्यामुळे औरंगाबादचे संभाजीनगर झालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी शिवसेनेने लावून धरली  आहे. विशेष म्हणेज राज्यात तीन विभिन्न विचारसरणीचे सरकार सत्तेवर असतांना शिवसेनेकडून हा मुद्दा  रेटला जातोय. महापालिका निवडणुकीचा आणि या मागणीचा काहीही संबंध नाही, असे शिवसेना सांगत असली तर मग संभाजीनगरसाठी आग्रही असणारी शिवसेना उस्मानाबादचे धाराशीव करा, अशी मागणी का करत नाहीये? त्यावर गप्प का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. किमान समान कार्यक्रमावर हे सरकार काम करेल, अशा आणाभाका घेऊन राज्याच्या कारभार सुरू झाला. दलित, मागास,अनुसूचित समाजाच्या प्रश्नांवर अधिक लक्ष द्या, त्यांच्या योजना राबवा, याची आठवण काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून नुकतीच करून दिली होती. अशा सगळ्या परिस्थितीत शिवसेनेकडून औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा मुद्दा पुढे केला जातोय, या मागे महापालिका निवडणूक हेच लक्ष्य आहे, हे सांगण्यासाठी कुण्या भविष्यकाराची गरज नाही.

८ मे १९९८ रोजी महापालिका निवडणुकीच्या प्रचारानिमित्तच बाळासाहेब ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभा झाली होती. तेव्हाच औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मनाबादचे धाराशीव असे नामकरण करण्यात आले होते. पुढे ९५ मध्ये युतीची सत्ता आली, मंत्रीमंडळाने प्रस्ताव मंजुर केला, त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका झाली. युतीचे सरकार गेले आणि विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखालील काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने आधीच्या सरकारचा नामांतराचा प्रस्ताव विखंडीत केला हा या विषयाचा एकंदरित घटनाक्रम.

पण ज्या शिवसेनाप्रमुखांनी औरंगाबादचे संभाजीनगर, अन् उस्मानाबादचे धाराशीव केले त्या शिवसेनेची आजची भूमिका मात्र फक्त संभाजीनगरपुरतीच मर्यादित असल्याचे दिसून येते. निवडणुकीचा संबंध नाही असा जर दावा शिवसेनेकडून केला जात असेल तर मग संभाजीगर बरोबर धाराशीवची मागणी त्यांच्याकडून का केली जात नाही, हा खरा प्रश्न आहे. विशेष म्हणजे जेवढी आग्रही मागणी संभाजीनगरसाठी होते, तेवढी  उस्मनाबादचे धाराशीव करा, यासाठी तिथल्या नेते,पदाधिकारी, शिवसैनिक देखील करतांना गेल्या कित्येक वर्षात दिसले नाहीत.

त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच औरंगाबादचे संभाजीगर करा, अशी मागणी करून हिंदु मते मिळवायची आणि पुन्हा आमची ही मागणी जुनीच आहे, असा दावा करायचा, हे म्हणजे ताकाला जाऊन भांड लपवण्या सारखचं म्हणावे लागेल. या संदर्भात उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीं देखील सावध भूमिका घेतल्याचे दिसते. संभाजीनगरचा मुद्दा पेटलेला असतांना धाराशीवची चर्चा अधिक होणार नाही, याची काळजी ते घेत असल्याचे त्यांनी घेतलेल्या हाताची घडी तोंडावर बोट या भूमिकेतून स्पष्ट होते.

या संदर्भात उस्मनाबाद-कळबंचे शिवसेना आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास घाटगे पाटील यांच्यांशी संपर्क साधला असता, उस्मनाबादचे धाराशीव करा, ही आमची मागणी कायम आहेच, आम्ही धाराशीवच म्हणतो, असे सांगत या विषयावर अधिक बोलणे टाळले. आता तीन पक्षांचे सरकार, त्यात काॅंग्रेसचा संभाजीनगरला होत असलेला विरोध पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न असलेले संभाजीनगर `करून दाखवणार`, का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com