गणपतराव देशमुख यांचा राजकीय वारसा सांगोल्यात कोण चालविणार?

तालुक्यात येणार्‍या विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आबांच्या वारसदारांची चर्चा होत असली तरी आबांचा वारसदार म्हणून निवडलेल्या व्यक्तीवर फार मोठी जबाबदारी येणार आहे.
ganpatrao deshmukh
ganpatrao deshmukh

सांगोला : राजकीयदृष्ट्या सांगोला (Sangola) म्हटले की 'शेकाप' पक्ष व शेकाप म्हटलं की, विक्रमवीर माजी आमदार कै. गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) असे समीकरण उभ्या महाराष्ट्रभर निर्माण झाले होते. परंतु गणपतराव देशमुख (आबांच्या) यांच्या निधनामुळे पक्षात व तालुक्याच्या राजकीय दृष्ट्या फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून येण्यासाठी त्यांच्या वारसदाराची चर्चा होत असली तरी आबांच्या वारसदारावर त्यांच्या विचारांची, तत्वांची, कुशल नेतृत्वाची, कष्टकरी,  सर्वसामान्यांना बरोबर घेऊन सर्वसमावेशक राजकारण करण्याची मोठी जबाबदारी येणार आहे.

सांगोला तालुका हा शेकाप पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. विविध संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा विधानसभेची निवडणूक असो गेल्या अनेक वर्षापासून या सर्वांवर शेतकरी कामगार पक्षाची एक हाती सत्ता  आहे. शेकाप पक्षात स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या हयातीत आबांचा शब्द अंतिम मानला जात होता. परंतु आबांनी कधीही राजकीयदृष्टी असो किंवा इतर कोणत्याही घटनेत एकतर्फी निर्णय घेतला नाही. त्यांच्या सर्वसमावेशक निर्णयामुळे पक्षात त्यांचाच शब्द अंतिम होता. परंतु गणपतरावांच्या निधनामुळे आबांशिवाय शेकाप हे पक्षातील सर्वसामान्यांना न पचणारे व न उलगडणारे कोडेच निर्माण झाले आहे.

तालुक्यात येणार्‍या विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आबांच्या वारसदारांची चर्चा होत असली तरी आबांचा वारसदार म्हणून निवडलेल्या व्यक्तीवर फार मोठी जबाबदारी येणार आहे. विक्रमी वेळा आमदार झालेले कै. गणपतराव देशमुख हे सर्वसामान्य, कष्टकरी जनता हीच पक्षाची व त्यांची खरी ताकत होती. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र ते प्रयत्न करताना दिसत होते. आबांनी कधीही कोणत्याही गोष्टीचा बडेजाव केला नाही. सर्वसामान्यांच्या अडचणीबरोबरच पक्षीय राजकारण, पक्षसंघटन अतिशय कुशलतेने हाताळले होते.

सर्वसमावेशक व सर्वमान्य नेतृत्वाची गरज -
आबांच्या निधनामुळे पक्षात व तालुक्याच्या राजकारणात झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सर्वसमावेशक व सर्वमान्य नेतृत्वाची गरज निर्माण झाली आहे. आबांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन पक्षाला येणाऱ्या विविध निवडणुकीमध्ये आपल्या अस्तित्वाची छाप टाकण्यासाठी वैयक्तिक अथवा सामुहिक नेतृत्वाची गरज आहे. पक्षात नेतृत्वाचा झेंडा कोणाच्याही हातात असो परंतु आबांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारा, त्यांची उणीव भरून काढणारे नेतृत्व पुढे आले पाहिजे अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

आगामी निवडणुकीसंदर्भात होतेय चर्चा :
आगामी येऊ घातलेल्या सांगोला नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात आतापासूनच वेगवेगळ्या चर्चा रंगू लागली आहे. युती, आघाड्याबाबत सोशल मीडियावरून विविध पोस्ट व्हायरल होत  आहेत. कोण-कोणते पक्ष एकत्रित निवडणूक लढणार, शहरातील महत्त्वाचे नेते कोणाबरोबर जाणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. परंतु आबांच्या नेतृत्वा शिवाय शेकाप पक्षा मध्ये या निवडणुकीत नेतृत्वाची कस मात्र लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com