मेहुणे खासदार चिखलीकर भावजी श्यामसुंदर शिंदेवर पडले भारी.. नांदेडात अनेकांना धक्का.. - While some leaders dominated in Nanded district, many were shocked. | Politics Marathi News - Sarkarnama

मेहुणे खासदार चिखलीकर भावजी श्यामसुंदर शिंदेवर पडले भारी.. नांदेडात अनेकांना धक्का..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 19 जानेवारी 2021

कंधार लोहा मतदरासंघाचे शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे  यांना हाळद्यात धक्का बसला. त्यांचे मेहुणे भाजपचे खासदार चिखलीकर यांनी त्यांच्या गटाचा पराभव केला. हळद्यात १३ पैकी ७ जागा चिखलीकर गटाने जिंकत ग्रामपंचायत ताब्यात घेतली. तर ६ जागा आमदार शिंदे गटाला मिळाल्या.

नांदेड ः जिल्ह्यातील ग्रामंपचायत निवडणुकीत काल अनेक नेत्यांना धक्का बसला तर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपले वर्चस्व कायम राखले. चिखलीकरांनी आपल्या ग्रामपंचायतीत ११ पैकी ७ जागा जिंकत सत्ता ताब्यात घेतली आहे. त्यांनी आपले भावजी आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पॅनलचा पराभव केला. तर अशोक चव्हाण यांनी देखील भोकरसह जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीवर काॅंग्रेसचा झेंडा फडकवला आहे.

नांदेड दक्षिणचे काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांच्या- विष्णपुरीत १५ पैकी १४ जागेवर हंबर्डै गटाने वर्चस्व मिळवले आहे, तर विरोधी गटाला तिथे फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. हदगावचे काँग्रेस आमदार माधव पाटील जवळगावकर यांच्या गटाने जवळगाव ग्रामपंचायतीत ९ पैकी ६ जागा जिंकत सत्ता मिळवली आहे.तर विरोधी गटाला तिथे ३ जागा मिळवण्यात यश आले.

नांदेड युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष माधव पावडे गटाने पावडेवाडी ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला आहे. इथे १७ पैकी १५ जागांवर युवासेनेच्गेया पॅनलने दणदणीत विजय मिळवला. तर भाजप पुरस्कृत पॅनलचा इथे धुव्वा उडाला.

या नेत्यांना धक्का

कंधार लोहा मतदरासंघाचे शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे  यांना हाळद्यात धक्का बसला. त्यांचे मेहुणे भाजपचे खासदार चिखलीकर यांनी त्यांच्या गटाचा पराभव केला. हळद्यात १३ पैकी ७ जागा चिखलीकर गटाने जिंकत ग्रामपंचायत ताब्यात घेतली. तर ६ जागा आमदार शिंदे गटाला मिळाल्या.

देगलूर - बिलोली मतदार संघाचे काँग्रेस आमदार  रावसाहेब आंतापूरकर यांच्या आंतापूर ग्रामपंचायतीत त्यांच्या गटाचा पराभव झाला आहे. ७  पैकी आतांपूरकर गटाकडे तीन तर हणमंत डोपेवाट गटाला चार जागा मिळाल्या. 

यगाव मधून आमदार राजेश पवार यांच्या गटाचा अलूवडगावात मोठा पराभव झाला. राजेश पवार गटाला ९ पैकी केवळ ३ तर शिवाजी पवार गटाला ६ जागांवर विजय मिळाला आहे.  तर नांदेड भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या पॅनलला मरखेलमध्ये धक्का बसला आहे. गोजेगावकर पँनलचा इथे धक्कादायक पराभव झाला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख